Benefits Of Yogurt : निरोगी, तंदुरुस्त शरीरासाठी पोषक घटक खूप महत्त्वाचे असतात. पण, बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयी याद्वारे आपण आपल्या शरीराला खरोखर आवश्यक असलेले पोषक घटक देतोय का याबद्दलही विचार करणे महत्त्वाचे आहे. ऑफिसला जाण्याची घाई, अपूर्ण झोप, बाहेरील जंक फूड, ताण आदी सर्व गोष्टी शरीराला हळूहळू आतून कमकुवत करीत असतात. त्यामुळे थकवा, वारंवार डोकेदुखी, कामावर लक्ष केंद्रित न होणे, गोष्टी विसरणे आदी आरोग्य समस्या उद्भवतात. पण, फार कमी लोकांना माहीत असेल की, यामागील कारण ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता हे आहे.

रक्तनिर्मिती, मेंदूचे कार्य व मज्जासंस्थेच्या आरोग्य या प्रत्येक गोष्टीत बी-१२ महत्त्वाची भूमिका बजावत असते. मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विद्यापीठाचे निवासी डॉक्टर मनीष जैन म्हणाले की, व्हिटॅमिन बी१२ शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या पदार्थांवर अवलंबून राहणे प्रत्येकासाठी शक्य नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घरगुती पदार्थांचा योग्य तो वापर करून, व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते.

दही

दह्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे पचन सुधारते आणि शरीराला थंडावा मिळतो. त्यात थोड्याफार प्रमाणात व्हिटॅमिन बी१२ सुद्धा असते. पण, दह्याबरोबर काही खास गोष्टी जोडल्या, तर साधे दही ‘बी१२ चे पॉवर बूस्टर’ बनू शकते.

पांढरे तीळ

पांढऱ्या तिळांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. त्यात निरोगी चरबी, खनिजे, जस्त, सेलेनियम असतात. हे तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत, तर शरीरात व्हिटॅमिन बी १२ चे चांगले शोषण करण्यासही मदत करू शकतात. एक चमचा भाजलेले पांढरे तीळ दह्यामध्ये मिसळून खाल्ल्याने पचन सुधारते, हाडे मजबूत राहतात आणि दिवसभर ऊर्जासुद्धा शरीराला मिळते.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे लहान असतात; पण आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात. त्यात लोह, फायबर, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले आणि सकाळी दह्यामध्ये मिसळून खाल्ले, तर शरीर पोषक घटक लवकर शोषून घेते आणि नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण वाढते. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.