लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पण अनेकदा कामाच्या नादात पुरुष मंडळी आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरतात. तुम्ही देखील आपल्या लग्नाचा वाढदिवस काही कारणामुळे विसरला का ? लग्नाचा वाढदिवस विसरणे हा कोणताही गुन्हा नाही, पण यामुळे रागावलेल्या बायकोचे मन वळवणे फारच कठीण असते. अशावेळी आपल्या जोडीदाराची माफी मागून तुम्ही हा दिवस आणखी चांगल्या पद्धतीने साजरा करू शकता हे जास्त महत्त्वाचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, आपल्याकडून जर अशी चूक झाली तर त्याला कसं सामोरं जावं आणि आपल्या जोडीदारासोबत हा दिवस आणखी चांगल्या पद्धतीने कसा साजरा करावा.
आपल्या जोडीदारासाठी एक छानसे सरप्राईज प्लॅन करा :
तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादे छानसे सरप्राईज प्लॅन करू शकता. तुमच्या पती/पत्नीची आवड लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तु खरेदी करू शकता. जर तुमच्या जोडीदाराला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही सुट्ट्यांच्या वेळी तुम्ही तुमच्या दोघांसाठीच रोमँटिक सहलीचे नियोजन करू शकता. तिकीट, हॉटेल बुकिंग इत्यादी आधीच बुक करून लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज देऊ शकता.
फुलांचा आधार घ्या :
जर तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस चुकून विसरला असाल, तर तुमच्या रागावलेल्या बायकोचं मन जिंकण्यासाठी फुलं हा एक सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो. आपल्या रागावलेल्या बायकोचा राग घालवण्यासाठी तुम्ही सर्वकाही करून पाहिले असेल तर फुलांचा गुच्छ हा एक उत्तम पर्याय आहे. हा फुलांचा गुच्छ देऊन तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करा. यामुळे नक्कीच तुमच्या बायकोचा राग निवळेल. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही सुंदर फुलांनी घर देखील सजवू शकता.
एकत्र वेळ घालावा :
अशा खास प्रसंगी आपल्या जोडीदाराने आपल्यासोबत वेळ घालवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. यासाठी तुम्ही एकत्र चित्रपट पाहायला किंवा जोडीदाराची आवड लक्षात घेऊन खरेदीलाही जाऊ शकता. जर तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत नसाल तर तुम्ही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरीच एखादा छानसा पदार्थ बनवून आपल्या जोडीदाराला सरप्राईज देऊ शकता. असे केल्याने तुम्हा दोघांना खूप खास वाटेल.