‘फ्लाइंग मॅन’नावाने प्रसिद्ध असलेले फ्रान्सचे फ्रँकी झपाटा यांनी पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रयत्नात जेट-पावर्ड ‘फ्लायबोर्ड’द्वारे ब्रिटिश खाडी पार केली आणि विक्रम रचला. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्याच्या 10 दिवसांनंतर लगेचच त्यांनी इतिहास रचला. यासोबतच चहाच्या ट्रे एवढ्याच आकाराच्या असलेल्या जेट-पावर्ड ‘फ्लायबोर्ड’द्वारे ब्रिटिश खाडी पार करणारे फ्रँकी झपाटा हे जगातील पहिलेच व्यक्ती ठरल्याचं ‘द सन’ने म्हटलं आहे.


ब्रिटनच्या वेळेनुसार (दि.4) सकाळी 7.16 मिनिटांनी 5 टर्बाइन इंजिन असलेल्या हॉवरबोर्डवर उभं राहून माजी जेट-स्काइंग चँपियन 40 वर्षीय झपाटा यांनी फ्रांसच्या उत्तर भागातील संगते येथून उड्डाण घेतलं. यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी झपाटा यांच्या पत्नीसह अनेकांनी गर्दी केली होती. झपाटांनी उड्डाण घेतल्यानंतर पाठोपाठ हेलिकॉप्टर देखील होतं. झपाटा यांच्या बॅकपॅकमध्ये 10 मिनिट पुरेल इतकं जवळपास 42 लीटर इंधन होतं. म्हणजेच इंधन पुन्हा भरण्यासाठी त्यांना समुद्रात मध्यावर असलेल्या रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मवर उतरणं आवश्यक होतं. गेल्या महिन्यात केलेल्या प्रयत्नात याच रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा त्यांचा अंदाज चुकला होता आणि ते थेट समुद्रात जाऊन पडले. पण यावेळेस त्यांनी कोणतीही चूक केली नाही आणि ते ठरलेल्या बोटीवरच उतरले. इंधन पुन्हा भरण्यासाठी त्यांच्याकडे केवळ 2 मिनिटांचा वेळ होता. यावेळी काहीही चूक न करता इंधन भरुन झपाटा यांनी पुन्हा उड्डाण घेतलं आणि ब्रिटिश खाडी यशस्वीपणे पार करत 7.39 वाजता सेंट मार्गारेट किनारपट्टीवर उतरले. या संपूर्ण प्रवासासाठी झपाटा यांना केवळ 23 मिनिटांचा वेळ लागला. ब्रिटिश खाडी यशस्वीपणे पार केल्यानंतर झपाटा यांनी जल्लोष केला. “यावेळी कीहीही अडचण आली नाही… मी खूप थकलोय, पण मला तितकाच आनंद देखील झालाय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच यासाठी त्यांच्यावर मेहनत घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि पत्नीचे झपाटा यांनी विशेष आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यातही झपाटा यांनी ब्रिटिश खाडी पार करण्याचा प्रयत्न केला होता. अशाप्रकारच्या कर्तबगारीमुळे जगभरात वेगळी ओळख निर्माण करणारे झपाटा त्यावेळी ब्रिटिश खाडी पार करण्यामध्ये अयशस्वी ठरले होते. एका बोटीवर रिफ्युलिंग प्लॅटफॉर्म(इंधन पुन्हा भरण्याची जागा) चुकवल्यामुळे ब्रिटिश खाडी पार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि ते समुद्रात जाऊन पडले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावेळी शोधनौकांनी तातडीने त्यांचा शोध घेतला होता, झपाटा यांना कोणतीही जखम झाली नव्हती, पण खाडी पार न करता आल्यामुळे ते निराश झाले होते. मात्र, आता दुसऱ्या प्रयत्नात खाडी पार करण्याच आनंद ते आपल्या चेहऱ्यावरुन लपवू शकले नाहीत. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी मराठीतील प्रचलित म्हण या ‘फ्लाइंग मॅन’ने सार्थ ठरवलीये.

पहिला प्रयत्न फसला त्यावेळचा व्हिडिओ –