Fridge Cleaning Tips: पावसाळा सुरू झाला की घरातल्या अनेक वस्तूंमध्ये ओलावा येऊ लागतो. कपडे वाळायला जास्त वेळ लागतो, भिंतींवर ओलसरपणा दिसते आणि सर्वात जास्त परिणाम स्वयंपाकघरावर होतो. विशेषतः फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू लवकर खराब होऊ लागतात.

भाज्यांचा ताजेपणा निघून जातो, मसाल्यांमध्ये ओलावा भरतो आणि फ्रिजमधून विचित्र वास येऊ लागतो. अशा वेळी एक छोटा उपाय या सगळ्या त्रासांपासून तुमची सुटका करू शकतो- तो म्हणजे फ्रिजमध्ये मीठाची वाटी ठेवणे. होय, एक साधी ट्रिक जी तुमची आई किंवा आजी खूप वर्षांपासून वापरत असतील. जर तुम्ही आजपर्यंत या सोप्या उपायाकडे लक्ष दिलं नसेल, तर आता नक्की द्या.

चला तर मग जाणून घेऊया फ्रिजमध्ये मीठ ठेवलं तर काय फायदे होतात…

१. फ्रिजमधला ओलावा करतात गायब (Fridge Moisture Remover)

मीठ हा एक नैसर्गिक ओलावा शोषणारा पदार्थ आहे. पावसाळ्यात हवेमधील ओलावा वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम फ्रिजमध्येही दिसतो. फळे आणि भाज्या लवकर सडतात, आणि फ्रिजच्या भिंती चिकट वाटतात. अशा वेळी जर तुम्ही फ्रिजच्या एका कोपऱ्यात मीठाने भरलेली वाटी ठेवली, तर मीठ हळूहळू आजूबाजूचा ओलावा शोषून घेतं आणि फ्रिजमधील हवेला कोरडं ठेवतं.

२. दुर्गंधी करतो कमी (Fridge Smell Remover)

अनेकदा फ्रिज उघडताच एक विचित्र वास येतो, जो वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तूंच्या वास एकत्र येऊन तयार होतो. मीठात वास शोषण्याची चांगली शक्ती असते, ते नैसर्गिक डिओड्रायझरसारखं काम करतं. काही दिवसांत तुम्हाला जाणवेल की फ्रिज आता आधीपेक्षा जास्त ताजं आणि स्वच्छ वाटतंय.

३. बुरशी आणि जंतूंपासून संरक्षण करतो.

ओलाव्याचा परिणाम फक्त वासापुरता मर्यादित नसतो, तर त्यामुळे फ्रिजमध्ये बुरशी आणि जंतूही वाढू लागतात. विशेषतः ट्रेच्या कडांवर किंवा कोपऱ्यांमध्ये काळे डाग दिसू लागतात. मीठ हवा कोरडी ठेवतो, त्यामुळे अशा घातक गोष्टी पसरू शकत नाहीत.

४. फळं-भाज्यांचे आयुष्य वाढते.

जेव्हा ओलावा कमी असतो, तेव्हा फळं आणि भाज्या लवकर सडत नाहीत. पालक, कोथिंबीर, मेथी किंवा कोबीसारख्या हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस ताज्या राहतात. मीठाची ही ट्रिक तुमचे पैसेही वाचवते कारण अन्न वाया जाणं कमी होतं.

योग्य वापर कसा करावा?

१. एक छोटी वाटी घ्या आणि त्यात ३-४ चमचे जाडसर मीठ भरा.
२. ही वाटी फ्रिजच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा- जसं फ्रिजच्या वरच्या भागात किंवा खालच्या शेल्फवर.
३. दर ८-१० दिवसांनी मीठ बदला, कारण ते हळूहळू ओलावा शोषून आपला प्रभाव कमी करतं.

आणखी काही सोप्या ट्रिक्स ज्या उपयोगी ठरतील:

१. मीठात थोडा बेकिंग सोडा मिसळा, यामुळे वास लवकर दूर होईल.
२. वाटीत सुके लिंबाचे साल टाका, हे नैसर्गिक फ्रेशनरसारखं काम करेल.
३. कॉफी बीन्स किंवा जुने सुकलेले टी बॅग्स जवळ ठेवा- हे फ्रिजमध्ये ताजेपणा टिकवायला मदत करतात.
४. जर पृष्ठभाग स्वच्छ ठेवायचा असेल, तर वाटीखाली अ‍ॅल्युमिनियम फॉइल ठेवा, त्यामुळे ओलसर मीठ फ्रिजला खराब करणार नाही.