कोणताही सण किंवा उत्सव असला की त्यातील आनंद द्विगुणित करण्यासाठी एखादा गोड पदार्थ नक्कीच हवा. त्यातच आता गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्यामुळे नैवेद्यामध्ये त्याच्या आवडीचे पदार्थ हे हमखास असायलाच हवे. त्यामुळे सध्या सगळ्या गृहिणी गोडाधोडाचं आणि खास करुन मोदक करण्यात गुंतून गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने उकडीचे किंवा कणकेचे तळलेले मोदक करतात. मात्र काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने मोदक करण्यासोबतच नव्या पद्धतीचे म्हणजे खव्याचे, चॉकलेटचे किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक करतात. यात खवा मोदक कसे करायचे याची कृती पाहुयात.

साहित्य :
अर्धा कप खवा
अर्धा कप साखर
दोन ते तीन टेबल स्पून मिल्क पावडर
दोन चिमटी वेलची पूड

कृती :

प्रथम छान बारीक अशी पिठीसाखर करुन घ्या. त्यानंतर मायक्रोव्हेवच्या भांड्यात खवा घेऊन तो १ मिनीटासाठी मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करुन घ्या. त्यानंतर तो बाहेर काढून खवा नीट एकजीव करुन घ्या. खवा नीट एकजीव झाल्यानंतर पुन्हा ४०-४५ मिनीटांसाठी खवा मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. ४० ते ४५ मिनीटांनंतर खवा मायक्रोव्हेवमधून काढल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ द्या. मात्र खवा पूर्णपणे थंड होण्यापूर्वी तो कोमट असतानाच त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला. त्यानंतर हे मिश्रण नीट एकजीव करा. मिश्रण एकत्र झाल्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये हे तयार मिश्रण घाला आणि मोदक तयार करा.
टीप्स :
१. मोदकाचं मिश्रण जर घट्ट झालं नसेल तर त्यात मिल्क पावडर घाला.
२. मिश्रण मळत असताना किंवा एकजीव करत असताना जास्त जोर देऊ नका. जास्त जोर दिल्यास मिश्रणाचा गोळा तुपकट आणि चिकट होतो.
३. साखर घातल्यानंतर मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये ठेवू नये. तसे केल्यास मिश्रण कडक आणि घट्ट होण्याची शक्यता असते.
सौजन्य – लोकप्रभा