Garam Masala Causes Acidity Or Indigestion : गरम मसाले हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. या मसाल्यांचा सुगंध, चव दोन्ही पदार्थांची चव वाढवण्यास मदत करतात; पण बरेच लोक तक्रार करतात की, गरम मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवते. जर तुमच्याबरोबरही असे घडत असेल, तर खालील माहिती तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे. गरम मसालेयुक्त पदार्थ खाल्ल्याने खरंच अ‍ॅसिडिटी, गॅस, पोटात जळजळ या समस्या जाणवतात का, तसेच या समस्यांपासून कशी मुक्तता मिळवायची जाणून घ्या.

गरम मसालेयुक्त पदार्थांनी खरंच अ‍ॅसिडिटी होते का? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

अलीकडेच आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या सांगतात की, गरम मसाले स्वतःच आम्लपित्त निर्माण करीत नाही. उलट त्यात असलेले जिरे, धणे, दालचिनी, वेलची, लवंग, काळी मिरी इत्यादी मसाले पचनास मदत करतात.

मग अ‍ॅसिडिटीची समस्या का जाणवते?

या प्रश्नाबाबत आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ सांगतात की, बहुतेक लोक गरम मसालेयुक्त पदार्थ खाताना काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे त्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊ…

१) मसालेयुक्त पदार्थ जास्त तेलात तळून खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी होते.
२) एकाच वेळी जास्त मसालेयुक्त पदार्थ खाल्ल्याने ही समस्या निर्माण होऊ शकतात.
३) बाजारातील पॅकेट केलेल्या मसाल्यांमध्ये आढळणाऱ्या मिश्रित पदार्थ किंवा रंगांच्या वापरामुळे अ‍ॅसिडिटी होऊ शकते.
४) जर एखाद्या व्यक्तीला आधीच आतड्यांमध्ये जळजळ किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल, तर त्यांनी मसालेयुक्त पदार्थ खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.
५) अशा परिस्थितीत गरम मसाल्याने पोटात जड जड वाटू शकते.

या समस्येपासून आराम कसा मिळवायचा?

१) गरम मसालेयुक्त पदार्थ कमी तेलात मर्यादित प्रमाणात शिजवा. चव वाढवण्यासाठी त्याचा कमी प्रमाणात वापर करणे पुरेसे आहे.
२) ज्या लोकांना आधीच अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी गरम मसालेयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे.
३) जेवणासह सॅलड, दही किंवा ताक घ्या, जेणेकरून गरम मसाल्यांचा परिणाम जास्त जाणवणार नाही.
४) त्याशिवाय घरी बनवलेला ताजा गरम मसाला वापरण्याचा प्रयत्न करा.