पावसाळा म्हणजे अनेक निवांत, सुखद क्षण अनुभवण्याची संधी! तुम्हाला पाऊस प्रचंड आवडत असेल तर तुम्ही असे क्षण सहसा सोडणार नाहीच. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असताना घरात कधी जुन्या गाण्यांसोबत गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घेत तर कधी फक्त वाफाळत्या कॉफीचा घोट आणि त्याचा अद्भुत सुगंध घेत तुमची एखादी संध्याकाळ अधिकच रम्य होऊन जात असेल. आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या आवडत्या कॉफीबद्दल. कॉफी प्रेमींसाठी अशा थंड पावसाळी वातावरणात कॉफीचा मोह आवरणं जरा कठीणच. कॉफीचे खरंतर एकापेक्षा एक सरस प्रकार आहेत. तुम्ही कॉफी प्रेमी असाल तर आपल्या कॉफीला काही भन्नाट ट्विस्ट देणं तुम्हालाही निश्चितच आवडत असेल. म्हणून, रेंज कॉफीच्या (Rage Coffee)सौजन्याने आज आम्ही तुम्हाला अशाच काही अत्यंत सोप्या, स्वादिष्ट आणि हटके कॉफी रेसिपीज सांगणार आहोत. यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करून पहा.

हॉट कॉफी आणि चॉकलेट पॅशन

साहित्य :

  • २ टेबलस्पून कॉफी ग्रॅन्यूल
  • १ कप कोमट दूध
  • १ टेबलस्पून कोको पावडर
  • वितळलेल्या चॉकलेटचा ½ बार
  • एक चिमूटभर दालचिनी
  • साखर (चवीनुसार)

कृती : वरील सर्व घटक आपल्या कॉफी कपमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्या. कुठेही गोळे राहणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचं हॉट कॉफी आणि चॉकलेट पॅशन तयार आहे.

मिन्टी ट्विस्ट

साहित्य :

  • १ कप ताजी तयार केलेली स्ट्रॉंग कॉफी (कॉफी ग्रॅन्यूल + गरम पाणी)
  • १ कप दूध
  • १ टेबलस्पून साखर
  • पुदिन्याची ५ ते ८ पानं
  • ५ ते १० तुकडे बर्फ

कृती : प्रथम एका शेकरमध्ये पुदिना आणि साखर व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर बर्फ, कॉफी आणि दूध घाला. सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी हलकं हलवा. हे मिश्रण एका ग्लासमध्ये घ्या आणि आणखी काही ताज्या पुदीनासह सजवा.

कॉफी बनाना शेक विथआऊट शुगर

साहित्य :

  • २ टेबलस्पून कॉफी ग्रॅन्यूल
  • १ केळ
  • १ कप दूध
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • ५ बर्फाचे तुकडे
  • चॉकलेट चिप्स (सजावटीसाठी)

कृती : वरील सर्व साहित्य सॉफ्ट होईपर्यंत ब्लेंडरच्या साहाय्याने एकजीव करा. त्यानंतर एका ग्लासमध्ये घ्या. चॉकलेट चिप्सने सजवा.