Renault कंपनीची Triber ही नवीन कार आज सादर केली जाणार आहे. कंपनीने एका टिझरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) प्रकारातील कार असेल अशी शक्यता आहे.

टिझर व्हिडिओद्वारे स्टाइलच्या बाबतीत ही कार रेनॉच्या कॅप्चर आणि कॅड्जर एसयुव्ही प्रमाणे असल्याचं दिसतंय. समोरुन या कारची रुंदी अधिक दिसत असून पुढील बाजूला मोठं बंपर, एलईडी डीआरएलसाठी वेगळं सेक्शन, रुंद हेडलँप, व्ही शेप ग्रिल आणि सेंटरमध्ये कंपनीचा मोठा बॅज आहे, याशिवाय या कारमध्ये रूफ रेल्स देखील असेल.

कारच्या आतील बाजूचं एकही अधिकृत छायाचित्र अद्याप समोर आलेलं नाही, पण सोशल मीडियात काही छायाचित्र व्हायरल झाले आहेत. यावरुन कारमध्ये ड्युअल-टोन इंटीरिअर स्किम असेल. डॅशबोर्डचं डिझाइन देखील सामान्य असण्याची शक्यता आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेला सपोर्ट करणारी मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम असेल. याशिवाय ड्रायव्हिंग-स्टाइल कोचिंग आणि ड्रायव्हर इकॉनॉमी रेटिंग यांसारखे काही नवीन फीचर्स असतील.

या कारमधील अधिकाधिक जागा वापरण्यास मिळावी असा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ही कार स्पेशियस आणि अल्ट्रा मॉड्युलर असेल. ही सात आसनी कार असेल आणि अधिक जागा वापरता यावी यासाठी यातील तिसऱ्या रांगेतील आसनं गरजेनुसार काढता येतील अशी शक्यता आहे.

सेफ्टी –
या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस, रिअर पार्किंग सेंसर्स आणि स्पीड वॉर्निंग सिस्टिम यांसारखे फीचर्स असण्याची शक्यता आहे. तर कारच्या टॉप व्हेरिअंटमध्ये रिअर पार्किंग कॅमेरा देखील असेल. याशिवाय या कारमध्ये कर्टन एअरबॅग्स (साइड एयरबॅग्स) असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पावर –
ट्राइबरमध्ये क्विड कारमधील 1.0-लिटर हे इंजिन काही बदलांसह वापरलं जाऊ शकतं. ट्राइबरमध्ये हे इंजिन 7hp अधिक ऊर्जा म्हणजे 75hp ची ऊर्जा निर्माण करतं. लाँचिंगवेळी यामध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असतील पण लाँचिंगच्या काही दिवसांनंतर 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही मिळण्याची शक्यता आहे.

किंमत –
कंपनीच्या क्विड या कारच्या पुढील सेगमेंटमध्ये ही कार येते. त्यामुळे 5.3 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत या कारची किंमत असण्याची शक्यता आहे.