तुम्हीही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावरील उपचारासाठी बाजारात लवकरच स्वस्त किंमतीतील औषधं उपलब्ध होणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, मधुमेहाच्या उपचारावरील महत्त्वाचं विल्डागलिप्टिन (Vildagliptin) नावाचं औषध नोवार्टिस ही कंपनी तयार करते. या कंपनीकडे असलेलं संबंधित औषधाचं पेटंट लवकरच म्हणजे डिसेंबर २०१९मध्ये संपणार आहे. एकदा या पेटंटचा कालावधी संपल्यानंतर अन्य कंपन्या या औषधाचे जेनेरिक व्हर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मधुमेहासाठीच्या थेरपीचा खर्च थेट ५० टक्क्यांनी कमी होईल, तसंच मधुमेहाच्या रुग्णांना कमी किंमतीतील औषधं अगदी सहज उपलब्ध होतील.

जाइडस कॅडिला, ग्लेनमार्क, मानकाइंड फार्मा, युएस विटामिन्स, सिप्ला आणि ऐबट यांसारख्या कंपन्या विल्डागलिप्टिन या औषधाचे जेनेरिक व्हर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. नोवार्टिसने गेल्याचवर्षी जवळपास 18 कंपन्यांच्या औषधाचं पेटंट संपल्यानंतर नवीन औषधांची निर्मिती थांबवली होती. सध्या बाजारात Sitagliptin, Vildagliptin and saxagliptin ही औषधं उपलब्ध आहेत. मधुमेहावरील या औषधाच्या एका दिवसाच्या थेरपीचा खर्च ४५ रुपये आहे. तो कमी होऊन थेट १० रुपयांवर येणार आहे.

देशात सध्या जवळपास ७ कोटींहून अधिक लोक मधुमेहानं त्रस्त आहेत. औषधोपचाराचा खर्च अर्ध्यावर येणार असल्यामुळे या रुग्णांना  नक्कीच दिलासा मिळेल. नोवार्टिसच्या प्रवक्त्यांकडून पेटंट संपणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.