Google आज आपला नवीन स्मार्टफोन Pixel 4a लाँच करणार आहे. गुगलचा हा फोन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून लाँचिंगआधीच या फोनचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत. गुगल पिक्सल 4a कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन असेल असं सांगितलं जात आहे. अॅपलने काही महिन्यांपूर्वी लाँच केलेल्या ‘स्वस्त’ iPhone SE 2020 स्मार्टफोनला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असेल अशी चर्चा आहे. हा फोन आधी मे महिन्यात गुगल I/O इव्हेंटमध्ये लाँच होणार होता. पण, करोना महामारीमुळे कंपनीने हा इव्हेंट रद्द केला होता.
किती असू शकते किंमत? :-
गुगल Pixel 4a हा फोन कंपनी किती वाजता लाँच करेल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. केवळ ३ ऑगस्ट रोजी हा फोन लाँच होईल इतकीच माहिती कंपनीने गेल्या आठवड्यात दिली आहे. पण, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी उशीरा हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. लाँचिंग आधीच फोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, गुगल पिक्सल 4a च्या 64जीबी व्हेरिअंटची किंमत 299 डॉलर (जवळपास 22,400 रुपये) असू शकते. पण, भारतात या फोनची किंमत नेमकी किती असेल याबाबत माहिती मिळालेली नाही. याशिवाय कंपनी हा फोन 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्येही सादर करेल.
काय असू शकतात फीचर्स? :-
लीक झालेल्या फीचर्सनुसार हा फोन अँड्रॉइड 10 ओएसवर कार्यरत असेल. फोनमध्ये कंपनी पंच-होल डिझाइनसह 5.8 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देऊ शकते. याशिवाय फोनमध्ये अॅड्रीनो 618 जीपीयूसोबत ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच, या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3,080mAh क्षमतेची बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm हेडफोन जॅक व युएसबी टाइप-C पोर्ट यांसारखे असू शकतात.