अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनी गुगल असिस्टंटचा आवाज कधी ना कधी नक्की ऐकला असेल. गुगलची ही सुविधा सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आपण कोणतीही गोष्ट बोललो की त्याबद्दलची सगळी माहिती गुगलवर एका महिलेच्या आवाजात आपल्याला मिळते. या महिलेचा आवाज भारतीयांसाठी अतिशय खास आहे. कारण या महिलेचा आवाज भारतीयांना खूप आवडतो असे नुकतेच समजले आहे. इतकेच नाही तर या महिलेशी लग्न करण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ४ लाख ५० हजार जण तयार आहेत. गुगल प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष ऋषी चंद्रा यांनी ही माहिती दिली आहे.
भारतीय लोक आपल्याला शोधायची असलेली एखादी गोष्ट टाईप करण्यापेक्षा बोलून सर्च करणे जास्त पसंत करतात असे गुगलकडून सांगण्यात आले. त्यामुळे गुगलची स्पिकर सुविधा अतिशय कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. गुगल स्पिकरतर्फे गुगल होम आणि गुगल होम मिनी या दोन्हीमध्येही व्हॉईस असिस्टंट सुविधा देण्यात येत आहे. सध्या ही सुविधा केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असून येत्या काळात ती हिंदीमध्येही उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.
गुगलने आपले व्हॉईस डिव्हाईस नुकतेच आपले स्पिकर नव्याने लाँच केले होते. त्यानिमित्ताने गुगलने एका नव्या बाजारात प्रवेश केला आहे. अॅमेझॉनच्या सध्या बाजारात असलेल्या इकोला त्यानिमित्ताने स्पर्धा निर्माण होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉनने आपले हे नवे डिव्हाईस लाँच केले होते. भारतात या गुगल होम स्पिकरची किंमत ९,९९९ आहे तर गुगल मिनी होमची किंमत ४,४९९ इतकी ठेवण्यात आली आहे. २० एप्रिलपासून हे डिव्हाईस फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याआधी अॅपलनेही मागील वर्षी आपले होमपॉड हे स्मार्ट स्पिकर्स लाँच केले होते.