Gudi Padwa २०१७ : अमेरिकेत ‘त्या’ दोघींनी उभारली नव्या संकल्पनेची गुढी

आठवड्यातून दोनदा साडी नेसण्याची ‘साडी प्लेज’ संकल्पना

Gudi Padwa
आपल्या देशापासून 'त्या' दोघीही दूर आहेत पण इथल्या संस्कृतीशी मात्र या दोघींनीही आपली नाळ घट्ट जोडून ठेवली आहे.

आपल्या देशापासून ‘त्या’ दोघीही दूर आहेत पण इथल्या संस्कृतीशी मात्र या दोघींनीही आपली नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. मानसी गणपुले आणि शीतल कुलकर्णी या दोन मैत्रीणी. त्या दोघी अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आर्किटेक्ट डिझायनर प्रोफेशनल्स आहेत. आज खास पाडव्यानिमित्त मराठमोळ्या पद्धतीने तयार होऊन आपल्या अमेरिकेतल्या घरात त्यांनी गुढी उभारून मराठी परंपरा जपली आहे पण इतकीच त्यांची ओळख करून देणं पूर्णपणे चुकीचे ठरेल.

manasi

मानसी गणपुले

दोन वर्षांपूर्वी मानसी आणि शीतलने आठवड्यातून एकदा साडी नेसण्याची शपथ घेतली आणि उदयास आली ‘साडी प्लेज’ही संकल्पना. भारतातल्या अनेकींना साडी नेसणं जमत नाही किंवा अनेकींना तर रोजरोज साडी नेसून बाहेर पडणं म्हणजे आऊटडेटेड वाटतं. भारतात ही गत तिथे अमेरिकेत कोण साडी नेसणार म्हणा. सतत जीन्स, टॉप, शॉर्ट किंवा वनपीसमध्ये वावरणा-या इथल्या महिल्यांमध्ये साडीबद्दल या दोघींनी एक आकर्षण तयार केलं. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही संकल्पना सुरू केली होती. फक्त साडी नेसणे हाच उद्देश नव्हता. या दोघींसारख्या अनेक भारतीय महिला येथे राहतात, या छोट्याश्या संकल्पनेतून त्यांना यासा-या जणींना एकत्र आणायचे होते. संस्कृतीचा आनंद लुटायचा होता पण त्याचबरोबर यातून काही मदत गोळा करून ती गरजू महिलांच्या आणि मुलांच्या सुयोगासाठी देखील द्यायची होती. मानसी आणि शीतलनं आपले साडीतले फोटो सोशल नेटवर्किंगवर टाकून ‘सारी प्लेज यूएसए मे २०१५’ असा फेसबुक ग्रुप तयार केला. ५० आठवड्यानंतर या उपक्रमाला प्रतिसाद वाढल्यावर नवीन ब्लॉग सुरू करण्यात आला.

sheetal

शीतल कुलकर्णी

अमेरिकेत या दोन्ही मराठमोळ्या मुलींची साडी प्लेज कल्पना चांगलीच हिट ठरली. सोशल मीडियामुळे ‘यूएस साडी प्लेज’ अमेरिकाभर तर पसरलीच, आता सिंगापूरसारख्या शहरांमधूनदेखील साडीप्रेमी मैत्रिणी या उपक्रमात सामील झाल्या आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saree pledge founder mansi kulkarni sheetal ganpule gudi padwa in america