गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे. सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, असे समजले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो, पण यंदा महाराष्ट्रासह जगभरात सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या थैमानामुळे करोना व्हायरसला पिटाळून लावू आणि या जागतिक महामारीवर मात करु अशा संकल्पाची गुढी उभारण्याची गरज आहे.

आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला (वर्षांला) नाव दिलेले असते. इतर कोणत्याही कालगणनेत अशा प्रकारे वर्षांला नाव दिलेले दिसत नाही. नवीन शके १९४० या संवत्सराचे नाव विलंबी संवत्सर असे आहे. आपल्याकडे साठ संवत्सरांचे (वर्षांचे) एक चक्र आहे. त्याप्रमाणे ती ६० नावे पुन्हा पुन्हा चक्रगतीप्रमाणे येत असतात. चैत्र महिन्यात भारतीय नूतन वर्षांचा प्रारंभ होतो. याच्याही पाठीमागे गणितीय सिद्धांत आहेत. आपल्या राशिचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षांतील पहिला महिना आहे. या चैत्र महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे. तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, त्याबाबतची कथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते. शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता. त्याने मातीचे सैन्य तयार केले व त्यावर पाणी शिंपडून त्या सैन्याला सजीव केले. या सैन्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला, या कथेचा लाक्षणिक अर्थ असा घेतला जातो की, दगड-मातीसारख्या चेतनाहीन, पौरुषहीन बनलेल्या त्या काळातील लोकांमध्ये शालिवाहनाने चैतन्याचा मंत्र भरला, उत्साहाने प्रेरित झालेल्या त्या सैन्याने मर्दुमकी गाजवली. शत्रूवर विजय मिळविला. सद्विचार, वीरश्री यांसारखे गुण आपल्यातच असले तरी काही वेळा त्यांना प्रेरित करावे लागते, हे काम शालिवाहनाने केले.

Gold price bounced in four hours on Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

शालिवाहनाने हुणांवर विजय मिळविलेला हा दिवस. सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून केलेल्या या युद्धामध्ये मिळवलेल्या विजयानंतर लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली असल्याने एक ऐतिहासिक महत्त्व या गुढीपाडव्याला आहे. तसेच रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येमध्ये दाखल झाले. त्यांचे स्वागत गुढय़ा, तोरणे उभारून केले गेले. गुढी उभी करणे हे विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्ष सुरू होताना त्याला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असले पाहिजे. तसे या चैत्रापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्याने उत्साहाचे असे नैसर्गिक वातावरण तयार झालेले असते. सणांचा आणि ऋतूंचा संबंध हा एकमेकांना पूरक असतो. म्हणून पुढे येणाऱ्या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून या दिवसापासून कडुनिंबाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यास सांगितले आहे. कडुनिंबामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे उन्हाळ्यापासून होणाऱ्या उष्णतेच्या विकारांचा त्रास कमी होतो.

सध्या व्यवहारात असलेल्या इंग्रजी कालगणनेनुसार काही जण १ जानेवारी रोजी काही नवीन संकल्प, नियम, उपक्रम करण्याचे ठरवितात. त्याचप्रमाणे विविध कारणांनी महत्त्व असलेल्या या नवीन संवत्सरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चांगले संकल्प केल्यास ते अधिक योग्य होईल. सध्याची परिस्थिती पाहता वैयक्तिक संकल्पांबरोबरच काही सामाजिक संकल्पही आपण सर्वानीच करणे आवश्यक झाले आहे असे वाटते.

‘संकल्पाची नवी गुढी उभारूया, पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करूया!’, ‘संकल्पाची नवी गुढी उभारूया, आपला परिसर स्वच्छ ठेवूया!’ असेही सामाजिक आशयाचे संकल्प करावेत.

संपूर्ण जगावर परिणाम करणारे सूर्य आणि चंद्र यांच्या गणितावर आधारित असलेली कालगणना पंचांगामुळे आपणास समजू शकते. सूर्याचा व चंद्राचा योग घडत असल्यामुळे तिथी, वार आदींवर आधारित चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांची रचना करण्यात आली आहे. काही धर्मामध्ये केवळ सूर्याचाच विचार करून वर्षमान ठरविले जाते. तर काही धर्मामधून केवळ चंद्राचाच विचार करून वर्षमान ठरविले जाते. मात्र चैत्र ते फाल्गुन या वर्षमानासाठी सूर्य आणि चंद्र या दोघांचाही विचार केल्याने निसर्गाचा समतोल कालगणनेशी साधला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा सूर्योदयाला ज्या दिवशी असेल तो नवीन वर्षांचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षांची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढय़ा उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षांचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे.

हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरीही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांगपूजन अवश्य करावे. गुढीपूजनाकरिता कोणताही विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल ते सर्व करता येते.

गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।

प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।

ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस आणि नववर्षांचा आरंभ दिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्त्व अबाधित राहणार आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा पाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन संवत्सर सुखाचे जावो ही सर्वाना शुभेच्छा!