पाडव्याच्या पूर्वसंध्येला विक्रेत्यांचे ‘कल्याण’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदू नववर्षांच्या स्वागतानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला घरोघरी तोरणे लावण्यासाठी सोमवारी कल्याणच्या फुलबाजारात ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. साऱ्यांनीच या बाजाराकडे धाव घेतल्याने सोमवारी पहाटे लागलेल्या या बाजारात अवघ्या काही तासांतच तब्बल आठ टन फुलांची विक्री झाली. या फुलबाजारात पाडव्याच्या पूर्वसंध्येला तब्बल सव्वा कोटींची उलाढाल झाल्याने येथील फुलविक्रेत्यांनी पाडव्याच्या आधी ‘दिवाळी’ साजरी केली.

गुढीपाडव्यानिमित्त फुलांना खूप मागणी असते. फुलांचे भावही काहीसे चढे असतात. गुढीपाडव्याचा आदला दिवस असल्याने सोमवारी फुलबाजारात गर्दी असणार हे अपेक्षित होते. मात्र यंदा ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद होता. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, आस्टर, जरबेरा, लिली, गुलछडी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. आंब्याची, कडुनिंबाची पानेही बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. फुलबाजाराला जत्रेचे स्वरूप आले होती.

फुले                        विक्रीचा दर

झेंडू पिवळा              ८० रु. किलो

झेंडू लाल                 ७० रु. किलो

शेवंती                     १२० रु. किलो

लिली                     २०० रु.जुडी

आस्टर  २५ जुडी    १०० रु.

गुलाब (साधा)      ५० रु.किलो

जरबेरा                 २० रु. जुडी

कोलकाता झेंडू      ७० रु.किलो

मोगरा                  २०० रु.किलो

लाल गुलाब          ३० ते ६० रु.जुडी

चिनी गुलाब        ५० ते ६० रु.जुडी

कल्याण बाजार समितीचा फूलबाजार मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे ग्राहकांची भरपूर गर्दी असते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने फुलांची मोठय़ा प्रामाणात मागणी वाढली आहे. यंदा जास्त तापमानामुळे फुलांच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. त्याच वेळी यंदा मागणी वाढल्याने फुलांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले.

– यशवंत पाटील, साहाय्यक सचिव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2017 eight tons flowers sold on occasion of gudi padwa in kalyan
First published on: 28-03-2017 at 02:35 IST