स्वागतयात्रांतील सहभागासाठी तरुणींची पसंती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये मोठय़ा उत्साहाने सहाभागी होणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये यादिवशी पारंपरिक पोषाख करून आकर्षक दिसण्याची स्पर्धाच जणू रंगलेली असते. त्यामुळेच सध्या गिरगाव, दादर भागातील तयार नऊवारी साडी विक्रेत्यांच्या दुकानांत गर्दी उसळत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही  दिवसांत येथील दुकानांत ७००हून अधिक साडय़ांची विक्री झाली असून सोमवापर्यंत तयार नऊवारी खरेदीचा जोर कायम राहील, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

नेसण्यासाठी सोयीच्या असल्याने या ‘रेडी टू वेअर’ नऊवारी साडीला महिला वर्गाची पसंती आधीपासूनच आहे. त्यात पाडव्याला शोभायात्रांचे आणि त्यात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने या साडय़ांना दरवर्षी मागणी वाढते आहे. केवळ महिलाच नव्हे तर शोभायात्रांचे आयोजक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक असलेल्यांकडूनही या साडय़ांची मोठय़ा संख्येने खरेदी होताना दिसत आहे. सध्या या साडय़ा कमीत कमी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध  आहेत.

मराठी नववर्षांच्या स्वागताकरिता पहिल्या दिवशी पारंपरिक पेहराव करण्याकडे असाही कल वाढला आहे. त्यात शोभायात्रा आणि प्रभातफेऱ्यांची संख्याही वाढली आहे. गोरेगाव, बोरिवली, मुलुंड आदी भागातही शोभायात्रा आणि प्रभातफेऱ्यांचे आयोजन केले जाऊ लागले आहे. यात सहभागी व्हायचे तर नऊवारी साडी आणि तिच्यावर मराठी पारंपरिक साज हवाच. त्यातच डोक्यावर भरजरी फेटा बांधून ‘बुलेट’ स्वारी करत महिला शोभायात्रेत सहभागी होऊ लागल्या आहेत. मात्र नऊवारी, त्यातच ओच्याची साडी नेसविण्याची कला फारच कमी महिलांना अवगत असते. त्यामुळेच महिलांनी ‘रेडी टू वेअर’ नऊवारी साडीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

या शिवाय शोभयात्रांचे आयोजक आणि विविध मंडळे मोठय़ा संख्येने अशा नऊवारी साडय़ांची खरेदी करत असल्याची माहिती दादरमधील ‘साडीघर’चे गौतम राऊत यांनी दिली.

गेल्या तीन दिवसांत ७००हून अधिक ‘रेडी टू वेअर’ नऊवारी साडय़ा गौतम यांनी तयार करून विकल्या आहेत. ग्राहकांच्या सोयीनुसार गौतम त्यांना साडी शिवून देतात. उदाहरणार्थ ढोल-ताशा पथकात वादन करणाऱ्या मुलींना कंबरेला ढोल बांधणे सोयीचे व्हावे यासाठी नऊवारी साडीला पट्टी शिवून लागते. ती त्यांना शिवून दिली जाते. गेल्या दोन-चार वर्षांत तर मोठी कॉर्पोरेट कार्यालये आणि वृत्तवाहिन्यांमधील महिला वृत्तनिवेदिकांसाठीही पाडव्यानिमित्ताने  ‘रेडी टू वेअर’ साडय़ांना मागणी असल्याचे गौतम यांनी सांगितले. दादरबरोबरच गिरगाव, विलेपार्ले, ठाणे या ठिकाणी या प्रकारच्या तयार साडय़ा बनविणारे कारागीर आहेत. त्या ठिकाणी सध्या या साडय़ांना चांगली मागणी आहे.

फेटेही तयार

तयार साडीसोबतच ‘रेडी टू वेअर’ फेटय़ांनाही सध्या विशेष मागणी आहे. ‘फेटा बांधणे ही किचकट प्रक्रिया असल्याने सर्वसाधारण अशा सणांच्या प्रसंगी आयोजक ‘रेडी टू वेअर’ फेटय़ाची मागणी करतात,’ अशी माहिती लालबागमधील आर.आर. ड्रेसवाला यांनी दिली. सध्या आम्ही एका शोभायात्रेसाठी ५०० ‘रेडी टू वेअर’ फेटे तयार करत आहोत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय पारंपरिक पद्धतीने फेटे बांधणाऱ्या कलाकारांना देखील मागणी आहे.  शोभायात्रेत जाऊन फेटा बांधण्यासाठी आम्ही प्रत्येक फेटय़ामागे ३० ते ५० रुपये घेत असल्याचे फेटे बांधण्याचे काम करणारे सुयोग पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2017 nauvari saree
First published on: 25-03-2017 at 02:05 IST