Happy Holi 2020 : लाल, पिवळा, हिरवा, तपकिरी अशा नानाविध रंगांची होळी.. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे रंगच आरोग्याला घातक ठरू लागल्याने रंगांचा बेरंग होऊ लागला आहे. त्यावर तोडगा म्हणून पाना, फुला, फळांपासून तयार केलेले कोरडे आणि ओले रंग सामाजिक संस्थांनी बाजारात आणले आहेत. पण बेरंग करणाऱ्या घातक रंगांचा वापर अद्याप पुरता बंद झालेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये घातक रंगांमुळे त्वचा, डोळे आदींवर परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातक रंग हद्दपार करण्यासाठी कंबर कसली असून गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गापासून बनविलेले रंग बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.

नैसर्गिक रंग निर्मिती अगदी साधी आणि सोपी आहे. झाडांची पाने, फुलांच्या पाकळ्या, फळे यांच्यापासून अगदी सहजगत्या नैसर्गिक रंग बनविता येतात. या रंगांमुळे आरोग्यास कोणताही अपाय होत नसल्याने मुक्तपणे रंगांची उधळणही करता येते. तसेच घातक रंगांप्रमाणे ते दीर्घकाळ अंगावर टिकूनही राहात नाहीत. त्यामुळे सुरक्षित रंगपंचमी साजरी करणे सहज शक्यही होते. स्वत: बनविलेल्या रंगांची उधळण करण्यात काही औरच मजा आहे. तर मग बनवा असे नैसर्गिक रंग..

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

लाल रंग
रंगपंचमीच्या दिवशी लाल रंगांचे आकर्षण काही औरच असते. लाल रंगात नखशिखान्त भिजून मित्र परिवाराच्या भेटीगाठी घेत दिवसभर फिरणाऱ्या तरुणाईच्या झुंडीच्या झुंडी दृष्टीस पडत असतात. लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करता येऊ शकेल. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळवून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. तो पाण्यात मिसळून रंगपंचमी साजरी करता येते. तसेच मधुमेहींसाठी वरदान ठरणाऱ्या जास्वंदीच्या फुलापासूनही लाल रंग बनविता येतो. जास्वंदीची फुले नाजूक असल्यामुळे ती उन्हाऐवजी सावलीत वाळवून घ्यावीत. त्यापासून तयार केलेली भुकटी पाण्यामध्ये उकळवून घ्यावी. निर्माण होणारे जाड मिश्रण आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळावे.

पिवळा
हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता येते. तसेच पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या किंवा नाजूक बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या सावलीत सुकवून घेतल्यानंतर त्यात बेसनचे पीठ मिसळल्यास कोरडा रंग तयार होईल. ओला रंग तयार करण्यासाठी या फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. त्यात आवश्यकतेनुसार हळद टाकून मिश्रण चांगले उकळवून घ्या.

हिरवा
हिरवा रंग – गुलमोहर, मेहंदीची पाने आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या पिठामध्ये भिजत ठेवा. कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा तयार करून या मिश्रणात मिसळा. म्हणजे हिरवा रंग तयार होईल.

केशरी
पांगाऱ्याच्या फुलांपासून केशरी रंग तयार करता येतो. पांगाऱ्याची फुले सावलीत वाळवून घेतल्यानंतर त्याची भुकटी बनवली की झाला कोरडा रंग तयार. ओला केशरी रंग तयार करण्यासाठी ही फुले रात्रभर पाण्यात भिजवावीत. त्यानंतर हे मिश्रण उकळविल्यानंतर ओला केशरी रंग तयार होतो. या रंगाला सुगंधही असतो.