Harvard Study on Kidney Stones: आरोग्य सुधारण्यासाठी किंवा शरीरात उर्जा वाढवण्यासाठी अनेक पुरुष विविध सप्लिमेंट्स घेतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी या सप्लिमेंट्स मदत करतात, असं अनेकांचं मत असतं. पण, याच सप्लिमेंट्सपैकी एक, ज्या गोळीला आपण “साधं आरोग्यपूरक व्हिटॅमिन” समजतो, तीच प्रत्यक्षात किडनीला धोका निर्माण करत असल्याचं समोर आलं आहे.
हार्वर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. या संशोधनात असं आढळून आलं की, ही विशिष्ट सप्लिमेंट्स दररोज मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या पुरुषांमध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता तब्बल दुपटीने वाढते.
२३ हजार पुरुषांवर ११ वर्षांचं संशोधन
हार्वर्ड व स्वीडनमधील संशोधकांनी २३,००० हून अधिक पुरुषांवर तब्बल ११ वर्षे संशोधन केलं. त्यात सुमारे २ टक्के पुरुषांना या काळात किडनी स्टोन झाला. पण, आश्चर्य म्हणजे जे पुरुष दररोज हाय डोस सप्लिमेंट्स घेत होते, त्यांना इतरांच्या तुलनेत दुपटीने अधिक धोका होता. साध्या मल्टिविटॅमिन्स घेणाऱ्यांमध्ये मात्र असा धोका आढळला नाही.
‘ही’ गोष्ट पुरुषांमध्येच जास्त का दिसते?
स्त्रियांवर याच प्रकारचं एक संशोधन झालं, पण त्यात असा धोका दिसून आला नाही. म्हणजेच पुरुषांच्या शरीरातील जैविक प्रक्रिया आणि हार्मोन्स या घटकाला वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात, यामुळे पुरुषांमध्ये किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता अधिक असल्याचं स्पष्ट झालं.
किडनी स्टोन नेमका तयार होतो कसा?
किडनी स्टोन म्हणजे शरीरातील खनिज आणि मीठ एकत्र येऊन तयार होणारा कठीण स्फटिक. अनेक घटकांमुळे हे तयार होतात; जसे की अनुवंशिकता, स्थूलपणा, पाण्याची कमतरता किंवा चुकीचा आहार. पण, या सप्लिमेंट्समुळे शरीरात ऑक्सलेट नावाचं संयुग जास्त प्रमाणात तयार होतं. हे ऑक्सलेट कॅल्शियमसोबत मिळून ‘कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन’ तयार करतं, जो सर्वात सामान्य प्रकारचा किडनी स्टोन आहे.
तज्ज्ञांचा इशारा
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. रॉबर्ट फ्लेचर यांनी सांगितलं की, “जर हे सप्लिमेंट्स खरोखरच कारणीभूत असेल, तर सुमारे ६८० पुरुषांपैकी एकाला केवळ या सप्लिमेंट्समुळे किडनी स्टोन होऊ शकतो.”
तज्ज्ञांचा सल्ला आहे की, ज्यांना आधीपासूनच किडनी स्टोनचा इतिहास आहे किंवा मूत्रसंस्थेच्या समस्या आहेत, त्यांनी अशा सप्लिमेंट्सपासून दूर राहावं.
मग सुरक्षित पर्याय कोणते?
तज्ज्ञ सांगतात की, फळं आणि भाज्यांमधून मिळणारं नैसर्गिक पोषण नेहमीच सुरक्षित असतं. संत्र, लिंबू, मिरच्या, पपई, स्ट्रॉबेरी यांसारख्या पदार्थांमधून मिळणारं पोषण शरीराला आवश्यक तेवढंच आणि संतुलित प्रमाणात मिळतं.
शेवटी धक्कादायक खुलासा!
ज्या सप्लिमेंट्समुळे हा धोका दुप्पट वाढतोय, ती म्हणजे व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स! रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकजण दररोज घेत असलेली हीच गोळी मोठ्या प्रमाणात घेतल्यास उलट किडनीला त्रासदायक ठरते.
हार्वर्डच्या संशोधनानुसार, शरीराला दररोज केवळ ७५-९० मिलीग्रॅम इतकं व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. पण, अनेक सप्लिमेंट्समध्ये त्यापेक्षा १० पट अधिक मात्रा असते, त्यामुळे ‘अधिक घेतलं तर चांगलं’ ही समजूत पूर्णपणे चुकीची ठरत आहे.
तज्ज्ञांचा सल्ला:
- नैसर्गिक आहारातूनच व्हिटॅमिन सी मिळवा.
- अनावश्यक हाय डोस सप्लिमेंट्स घेऊ नका.
- किडनी स्टोनचा इतिहास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कारण आरोग्य सुधारायचं म्हणून घेतलेली गोळीच जर आजाराचं कारण ठरली, तर त्याहून मोठा धोक्याचा इशारा दुसरा कोणता?
