वॉशिंग्टन : एखाद्या छंदात स्वत:ला गुंतवून घेतले आणि त्याचा आनंद घेत राहिला की मानसिक आरोग्य सुधारते. बागकाम हा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो, असे एका संशोधनात दिसून आले.

अमेरिकन कर्करोग सोसायटी आणि ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. सामुदायिक बागकाम केल्याने अधिक फायबर खाल्ले जाते आणि शारीरिक हालचाली अधिक होतात, असे या संशोधकांनी केलेल्या चाचणीतून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे कर्करोग आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो आणि मानसिक आरोग्यही सुधारते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. बागकामामुळे तणाव आणि चिंतेची पातळीही लक्षणीयरीत्या कमी होते, असे या संशोधकांनी सांगितले. ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’चे संशोधक लिट म्हणाले, ‘‘बागकाम करणाऱ्या अनेकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की बागकामामध्ये असे काही तरी आहे की ज्याने बरे वाटते. बागकामामुळे मानसिक आनंद मिळतो. काही लहान निरीक्षणांमध्ये असे आढळून आले की, जे लोक बाग करतात ते अधिक फळे आणि भाज्या खातात आणि आरोग्यदृष्टय़ा ते मजबूत असतात.