नवी दिल्ली : वयाच्या पंचेचाळीस ते पन्नाशीत पोहोचल्यावर स्त्रीच्या शरीरातील पुनरुत्पादनासाठीच्या उपयोगी संप्रेरकांचे प्रमाण घटते व मासिक पाळी थांबून रजोनिवृत्ती येते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, चाळिशीच्या पूर्वी येणाऱ्या रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये हृदयक्रिया बंद पडण्याची (हार्ट फेल्युअर) जोखीम वाढते. तसेच हृदयगती अनियमित होण्याचाही धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञ सांगतात. ‘युरोपीय हार्ट जर्नल’ या विज्ञानपत्रिकेत याबाबतचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.  सुमारे १४ लाख स्त्रियांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार रजोनिवृत्ती जेवढी अलीकडच्या वयाच्या टप्प्यावर येईल, तेवढी वरील हृदयक्रिया बंद पडण्याची व अनियमित हृदयगतीची जोखीम वाढत जाते. त्यामुळे रजोनिवृत्ती लवकर आलेल्या स्त्रियांनी हृदयाची तपासणी नियमितपणे करून घ्यावी. तसेच धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने असतील, तर ती तातडीने सोडून द्यावीत. तसेच नियमित व्यायाम सुरू करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. संशोधकांनी या अभ्यासात अकाली रजोनिवृत्ती आणि हृदयक्रिया बंद पडणे किंवा अनियमित हृदयगतीच्या संबंधांबाबतचे विश्लेषण केले. त्यासाठी धूम्रपान, मद्यपान, शारीरिक हालचाली, शरीराचे वस्तुमान गुणोत्तर (बॉडी मास इंडेक्स), रक्तदाब, टाइप २ मधुमेह, मूत्रिपड विकार, मेदाचे प्रमाण, संप्रेरकांसंबंधी उपचार (एचआरटी) इतर प्रकारचे हृदयविकार आणि मासिक पाळी बंद होण्याच्या वयाचाही विचार केला. त्यात अशी माहिती समोर आली, की अकाली रजोनिवृत्ती आलेल्या स्त्रियांमध्ये हृदयक्रिया बंद पडण्याची जोखीम सरासरी ३३ टक्क्यांनी वाढते. तसेच अनियमित हृदयगतीची जोखीम ९ टक्क्यांनी वाढते.  तुलनेने सामान्य वयोमानापेक्षा जितक्या कमी वयात रजोनिवृत्ती येईल, तेवढय़ा या विकारांची जोखीम वाढते. पन्नाशीत रजोनिवृत्ती आलेल्या महिलांच्या तुलनेत ४५ ते ४९ वयोगटात रजोनिवृत्ती आलेल्या स्त्रियांत ११ टक्के, ४० ते ४४ वयोगटांतील महिलांत २३ टक्के आणि चाळिशीच्या आत रजोनिवृत्ती आल्यास हृदयक्रिया बंद पडण्याच्या जोखमीत ३९ टक्क्यांनी वाढ होते. हृदयगती अनियमित होण्याचे प्रमाण ४५ ते ४९ वयोगटात रजोनिवृत्ती आल्यास ४ टक्के, ४० ते ४४ वयोगटात दहा टक्के आणि चाळिशीच्या आत अकरा टक्क्यांनी ही जोखीम वाढते, असे हा अभ्यास सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित स्त्रीचा प्रसूती इतिहास, धूम्र-मद्यपानाचाही या जोखमीत हातभार लागतो. रजोनिवृत्तीनंतर ही जोखीम वाढण्याच्या कारणांमध्ये ‘ओस्ट्रोजन’ या संप्रेरकात घट होणे व शरीरातील मेदाच्या प्रमाणात बदल होण्याचाही समावेश आहे. त्यामुळे अकाली रजोनिवृत्ती टाळून योग्य नैसर्गिक वयात ती येण्यासाठी, स्त्रियांनी निरोगी जीवनशैली अवलंबावी. मद्य-धूम्रपान टाळावे, पौष्टिक आहार घ्यावा, नियमित व्यायामाने योग्य वजन राखावे, तसेच नियमित वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करावेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news risk heart disease premature menopause heart action heart failure ysh
First published on: 13-08-2022 at 00:02 IST