डॉ. नारायण गडकर

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा आपण किरकोळ वाटणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करतो. मात्र या आजारांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, हेच आजार कालांतराने त्रासदायक ठरतात. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा आपण छातीत दुखायला लागलं की त्याकडे दुर्लक्ष करतो. पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असेल किंवा जास्त धावपळ केल्यामुळे दुखत असेल अशी कारणं देऊन आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. मात्र छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटँक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. त्यामुळेच हृदयविकारचे प्रकार कोणते, त्यांची कारणं कोणी हे आपण जाणून घेऊ.

हृदयविकाराची प्रमुख कारणे –

१. हृदयाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो.

२. व्यायामाचा अभाव

३.अतिताणतणाव

४.धुम्रपान व मद्यपान करण्याची सवय

५. लठ्ठपणा

६. अयोग्य जीवनशैली

७. पौष्टिक आहाराचा अभाव

हृदयविकाराचे प्रमुख प्रकार

१. कोरोनरी आर्टरी डिसीज –

कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे. ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक (फॅटी पदार्थ) जमा होतात. यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, धाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात.

२.हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी –

हा अनुवांशिक आजार असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणे, श्वास घेता न येणे आणि पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात.

३. जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. (उदा. हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष), भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणे ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात.

४. कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हृदयापर्यंत पोहोचल्यासही हृदयविकार होऊ शकतो. यामुळे हृदयात जळजळ होणं ही समस्या उद्भवते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखक डॉ. नारायण गडकर हे चेंबूरमधील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजिस्ट सल्लागार आहेत.)