Cake Caused Poisoning Health Effect: अलीकडेच पंजाबमधील पटियाला येथे एका १० वर्षीय चिमुकलीचा वाढदिवसानिमित्त ऑनलाइन ऑर्डर केलेला चॉकलेट केक खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. स्थानिक बेकरीमधून ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानंतर काही वेळातच १० वर्षांची मानवी आणि तिचे संपूर्ण कुटुंब आजारी पडले होते. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, केक खाल्ल्यावर मानवीला उलट्या होत होत्या आणि तिला रुग्णालयात नेण्यापूर्वी तिला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यानंतर तिला काही वेळाने मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केकमध्ये सॅकरिन नावाचे कृत्रिम स्वीटनर वापरण्यात आले होते. नेमकं नेमकं हे स्वीटनर आपल्या शरीरासाठी कसं घातक ठरू शकतं, हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणार आहोत.

कृत्रिम स्वीटनरचा प्रभाव

डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन, वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजी, स्पार्श हॉस्पिटल बंगळुरू यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “सॅकरिनसारख्या कृत्रिम गोड पदार्थांच्या अधिक सेवनामुळे सूज येणे, गॅस होणे, अतिसार यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. काही कृत्रिम गोड पदार्थ आतड्यांमध्ये ऑस्मोटिकली सक्रिय असू शकतात, म्हणजे काय ते आतड्यात पाणी खेचतात आणि अतिसार होऊ शकतो. सॅकरिन आणि इतर कृत्रिम स्वीटनर्समुळे डोकेदुखी होऊ शकते. मूड बदलणे, चक्कर येणे यासारखी न्यूरोलॉजिकल लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात.

कृत्रिम स्वीटनर्समुळे वजन व मधुमेह वाढतो का?

डॉ. प्रणव सांगतात की, “कृत्रिम गोड पदार्थांचा वापर वजन किंवा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी केला जात असला तरी काही अभ्यासात याचा प्रभाव उलट दिसून आला आहे. या कृत्रिम स्वीटनर्सचा दीर्घकाळापर्यंत जास्त वापर केल्याने चयापचय प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे वजन आणि इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते.”

तसेच, सॅकरिनच्या अतिसेवनामुळे विषबाधा होऊ शकते, ज्याचा प्रामुख्याने यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम होतो, अत्यंत उच्च डोसमुळे यकृत आणि मूत्रपिंड पूर्ण बिघडू शकते. यामुळे ऍसिडोसिस होऊ शकते, जी एक धोकादायक स्थिती आहे ज्यात रक्त खूप आम्लयुक्त होते. कृत्रिम स्वीटनरचे जास्त सेवन केल्याची लक्षणे मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि असामान्य थकवा यांचा समावेश होतो. यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, विशेषत: कृत्रिम स्वीटनर्स असलेली उत्पादने मोठ्या प्रमाणात खाल्ल्यानंतर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

हे ही वाचा << बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?

काय खबरदारी घ्याल?

कृत्रिम स्वीटनर खरेदी करताना, ग्राहकांनी घटकांची लेबल्स काळजीपूर्वक तपासावीत आणि घटकांची तपशीलवार माहिती न देणाऱ्या उत्पादनांची खरेदी टाळावी. याशिवाय नियमक एजन्सींनी कृत्रिम स्वीटनरच्या वापरावर कठोर नियंत्रणे लागू केली पाहिजेत. सर्व अन्न उत्पादने निर्धारित सुरक्षित पातळीचे पालन करतात याची खात्री करून घ्यायला हवी.