Types of Oils for Healthy Health: आयुर्वेदात तेलाला वातविकारात एक नंबरचे स्थान आहे. तेल ज्या बियांपासून निघते त्या पदार्थांचे गुण त्यात असतातच. शिवाय प्रत्येक तेलाचे स्वत:चे गुण आहेत. जेव्हा शरीरभर व्यापणाऱ्या विकारांकरिता, सर्व शरीरात औषध पोचायला हवे त्या वेळेस तेल अंतर्बाह्य द्यावे. तेल त्वचेत लवकर जिरते, त्वचेची रुक्षता घालवते. फाजील कफ उत्पन्न होऊ देत नाही.
आयुर्वेदात तीळ तेलाची मोठी महती आहे. तेल युक्तीने दिले तर मलमूत्रांच्या वेगांचे नियमन करते. तेलाचे विशेष कार्य अपान वायूवर आहे. त्यामुळे मलमूत्र, गर्भनिष्क्रमण, आर्तव व शुक्रस्थान यांचे कार्य बिघडल्यास योजनापूर्वक तेलाचा वापर करावा. मळाचा खडा होत असल्यास पहाटे किंवा सायंकाळी पाच वाजता तीन चमचे तेल आपल्या आवडीप्रमाणे गरम पाण्याबरोबर घ्यावे. त्यासोबत किंचित लिंबू किंवा चिंचेचे पाणी व मीठ चवीपुरते मिसळावे.

सुखकर बाळंतपणासाठी…

लघवीला वारंवार होत असल्यास झोपण्यापूर्वी दोन चमचे तेल प्यावे. लघवीचे दोन वेग तरी कमी होतात. सुखाने बाळंतपण पार पाडण्याकरिता सातव्या महिन्यापासून नियमितपणे दोन चमचे तेल प्यावे. टाके पडत नाहीत. वारंवार स्वप्नदोषाने दुर्बळ असल्यास सकाळी तीळतेल दोन चमचे घ्यावे.

मासिक पाळीच्या तक्रारींसाठीही उपयुक्त

लहान बालकांना कृमी, मलावरोध, पोट फुगणे, पोटाचा नगारा या तक्रारी असल्यास चमचाभर तीळतेल किंचित मिरेपूड व गरम पाण्याबरोबर द्याावे. स्त्रियांची मासिक पाळी कष्टाने येत असल्यास, पाळीत अंगावर कमी जात असल्यास, पोट दुखत असल्यास तीळतेल नियमित सकाळी, सायंकाळी दोन चमचे घ्यावे, वर कोमट पाणी प्यावे. स्थूल व्यक्तीच्या रक्तात चरबीचे फाजील प्रमाण (सेरेम कोलेस्ट्रॉल) नसल्यास तसेच त्यांना रुक्ष मळ, त्यामुळे शौचाला खडा होत असल्यास नियमितपणे आठ-पंधरा दिवस तेल प्यावे. तक्रारी दूर होतात. स्थूल व्यक्तींचा स्नायूंचा बेढबपणा, फाजील चरबी माफक प्रमाणात तेल घेतल्यास कमी होते.

अग्निमांद्यावर गुणकारी

अग्निमांद्य विकारात पहाटे दोन चमचे तेल व त्याचबरोबर चिमूटभर सुंठचूर्ण व सोबत गरम पाणी घेतले तर दुपारी चांगली भूक लागते. मात्र भूक लागेपर्यंत मध्ये काहीही खाऊ नये. अंग बाहेर येणे, योनिभ्रंश, गुदभ्रंश विकारांत सायंकाळी सहा वाजता दोन-तीन चमचे तेल कोमट पाण्याबरोबर घ्यावे. वायूवर नियंत्रण होते. अंग बाहेर येण्याकरिता चेक बसतो. हर्निया, अंडवृद्धी या विकारांत गोडेतेल, लसूण रस, कणभर हिंग व चवीपुरते मीठ असे मिश्रण कोमट पाण्याबरोबर पहाटे घ्यावे.

कंबर, गुडघे, खांदे, पाठ व सांधेदुखीसाठी…

कंबरदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी यांसारख्या मणके व हाडांच्या दुखण्यात कृश व्यक्तींनी खोबरेल तेल माफक प्रमाणात नियमितपणे घ्यावे. स्थूल व्यक्तींनी तीळ तेल घ्यावे. मलावरोध, आमवात, सायटिका, खांदा जखडणे या विकारांत एरंडेल तेल प्यावे व सुंठपाणी घ्यावे.

बाह्योपचार

संधिवात, आमवात, संधिशूल, अर्धांगवात अशा नाना तऱ्हेच्या वातविकारात तेलाचा मसाज उपयुक्त आहे. हातापायांना खालून वर, पाठ, पोट, खांदा, गुडघा, मान यांना गोल पद्धतीने रात्रौ झोपताना व सकाळी आंघोळीच्या अगोदर हलक्या हाताने मसाज करावा. तेल जिरवायचे असते. म्हैस रगडल्यासारखी पैलवानकी येथे उपयोगी पडत नाही. म्हातारपण लांब ठेवणे, श्रम सहन व्हावे व समस्त वातविकार बरे व्हावेत म्हणून आयुर्वेदाने तेल मसाज ही मानवाला मोठी देणगी दिली आहे. अनेक औषधे खाण्यापेक्षा थोडा वेळ काढून वातविकार रुग्णांनी नित्य मसाज करावा.

तेलाचे कुपथ्य

कावीळ, जलोदर, पोटात पाणी होणे, यकृत व पांथरीची सूज, रक्तदाब खूप वाढणे, रक्तात चरबी वाढणे, अंगाला मुंग्या येणे, स्थौल्य, शौचाला घाण वास येणे, चिकट आमांश असे परसाकडला होणे, आमवात, अजीर्ण, आव, हृद्रोग या विकारांत पोटात तेल घेऊन नये. ज्या आमवातात तेल चोळण्याने दु:ख कमी होण्याऐवजी वाढते, तसेच जे शरीर अगोदरच खूप स्निग्ध, तसेच घाम खूप येत असताना तेलाचा मसाज करू नये.

स्वयंपाकासाठीचे तेल

आतापर्यंत आपण तेलाचे पोटात घेण्याकरिता वापरत असलेल्या प्रकाराबद्दलची माहिती घेतली. स्वयंपाकाकरिता किंवा पोटात घेण्याकरिता देशकालपरत्वे वेगवेगळ्या प्रकारची तेले जगात विशेषत: भारताच्या विविध भागांत वापरात आहेत. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल या बहुसंख्येच्या भारत देशात शेंगदाणा तेलाचा वापर प्रामुख्याने आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांच्या काही अतिथंड हवामानाच्या प्रदेशात स्वयंपाकाकरिता मोहरीच्या, नाकात जाणाऱ्या स्ट्राँग वासाच्या तेलाचा वापर फोडणीकरिता केला जातो. ज्यांना झणझणीत तोंडीलावणी आवडतात अशा खवय्यांकरिता मायभगिनी मोठ्या कौतुकाने मोहरीच्या तेलाची फोडणी असलेली लोणची बनवितात. केरळात, गोमंतक व कोकणाच्या काही भागांत स्वयंपाकाकरिता खोबरेल तेलाचा वापर असतो.

बाह्योपचारार्थ जेव्हा तेलाचा वापर केला जातो तेव्हा त्या त्या तेलांच्या बियांच्या मूळ गुणधर्माबरोबरच, ज्या वनस्पतींच्या साहाय्याने तेल सिद्ध होते त्या वनस्पतींचे गुणधर्म त्यात उतरत असतात. उदा. घरात नवीन बाळ जन्माला आले की माय-लेकरांकरिता चंदनबलालाक्षादी तेलाचा वापर दोघांनाही अभ्यंग-मसाज- तेल जिरवण्याकरिता केला जातो. त्या तेलात चंदन, बला, चिकणा, लाख अशा वनस्पतींचे गुणधर्म प्रामुख्याने असतात. शरीरातील सर्व स्नायूंना लवचिकता यावी, रोजच्या रोज सहजपणे मसाजाकरिता तेल वापरता यावे व ज्या तेलाच्या निर्मितीकरिता एकच घटकद्रव्य पुरेसे आहे अशा शतावरी सिद्ध तेलात, शतावरीचे- शतवीर्या सहस्रवीर्या वनस्पतीचे गुण असतात. त्यामुळे अशा तेलाचे मर्दन करून घेऊन आपले स्नायू कोणत्याही कठीण कामाला सक्षम होतात. हेच तेल पोटात घेतल्यास आमाशयापासून ते पक्वाशयापर्यंत रुक्षता आलेली आतडी स्निग्ध होतात. ही रुक्षता यायला कुपोषण, जागरण, विविध व्यसने, अनिद्रा, चिंता, परान्न, कदन्न अशी अनेकविध कारणे असतात. महाराष्ट्रात गेली पासष्ट वर्षे खूप लोकप्रिय असणाऱ्या बलदायी महानारायण तेलात पाच प्रकारची तेले घटकद्रव्ये म्हणून वापरात आहेत. ‘अधिकस्य अधिकं फलम्।’ या न्यायाने तीळतेल, करंजेल तेल, लिंबोणी तेल, एरंडेल तेल व मोहरी तेल अशी विविध प्रकारची पाच तेले एका थोर वैद्याांनी निवडली. त्याचबरोबर त्यात शतावरी, आस्कंद, भुईकोहळा, लाख, वाकेरी, चिकणा, देवदार, एरंडमूळ, त्रिफळा, दशमुळे अशी विविध औषधी द्रव्ये वापरली. त्यामुळे या सगळ्यांचा एकत्रित गुणसमुच्चय- अभ्यंगार्थ तेल वापरणाऱ्यांना लगेचच मिळतो.

महाविषगर्भ तेल

पण क्वचितच शंभरात एखाद्या व्यक्तीला मोहरीच्या तेलामुळे अंगाला खाज सुटते, असो. दुर्धर संधिवात, आमवात, ग्रधृसी (सायटिका), अवबाहुक (फ्रोजन शोल्डर), गुडघेदुखी, कंबरदुखी अशा विकारांच्या असाध्य अवस्थेत महाविषगर्भ तेलाचा आग्रहाने वापर केला जातो. त्यात तीळतेल व अनेक तीक्ष्णोक्ष्ण वनस्पतींबरोबर बचनाग या विषद्रव्याचा ‘बाह्योपचारार्थ’ समावेश केलेला आहे. असे हे तेल शीतकाळी, थंड प्रकृतीच्या व बलदंड व्यक्तींकरिताच वापरावे, हे येथे आवर्जून सांगावयास हवे. ज्यांना काही द्रव्यांची अ‍ॅलर्जी आहे, अशांनी या तेलाचा बाह्योपचारार्थ वापर कटाक्षाने टाळावा.

केसांच्या आरोग्यासाठीची तेले

जगभर बघणेबल चेहरा-तारुण्यपीटिका, मुरुम याकरिता तसेच केस गळणे, केस पिकणे, केसांत कोंडा होणे अशा समस्यांकरिता तरुण मुले-मुली व वृद्ध माणसेही फार चिंताग्रस्त असतात. त्याकरिता जगभर स्थानकालपरत्वे विविध वनस्पतींपासून खूप प्रकारची तेले शेकडो कंपन्या बनवत आहेत व ती मोठ्या संख्येने खपत आहेत. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ‘जबाकुसुम तेल’- बंगालमध्ये तयार होणारे केसांकरिता मोठ्या संख्येने लोक विकत घेत व वापरत. त्यामध्ये जास्वंद फुले ही प्रमुख वनस्पती वापरलेली असे. याशिवाय माक्याच्या पानांपासून महाभृंगराज तेल, आवळ्यापासून आमला किंवा आमलक्यादी तेल, वडाच्या पारंब्यांपासून वटजटादी तेल, कोरफडीच्या गरापासून कोरफड तेल अशी खूप खूप तेले व सौम्य प्रकृतीकरिता जास्वंद, त्रिफळा, गुलाबकळी, नागरमोथा, शतावरी, चंदन अशा वनस्पतींपासून बनविले जाणारे जपाकुसुमादी तेल अशी तेले आपल्या विविध गुणांनी केसांच्या आरोग्याची काळजी उत्तम प्रकारे घेत आहेत.

गुडघेदुखीवर सर्वाधिक प्रभावी नारिकेल तेल

ज्यांना परसाकडला त्रास होतो, तीव्र मलावरोध आहे, त्यांच्याकरिता चिंचेचा कोळ, कणभर मीठ व गोडेतेलापासून ‘चिंचालवण तेल’ घरच्या घरी ताजे बनवता येते. ज्यांच्या गुडघ्यावरील वंगण कमी झाले आहे, गुडघ्यातून कट्कट आवाज येतो, जिना उतरताना त्रास होतो, त्यांच्याकरिता घरच्या घरी ओल्या नारळापासून ‘नारिकेल तेल’ तयार करता येते. मोठा नारळ आणावा, तो किसणीने खवावा आणि त्याच्या खोबऱ्यात थोडे पाणी मिसळून ते दूध रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे. सकाळी वर आलेला तो नारळाच्या लोण्यासारखा पदार्थ मंदाग्रीवर गरम करावा. तुपासारखे उत्तम तेल तयार होते. असे तेल सकाळ-संध्याकाळ १५ मिली. प्रमाणात पोटात घेतल्यास, गुडघेबदल, खुबेबदल यांच्याकरिता लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत.

तोंडाच्या आरोग्यासाठी तेले

ज्यांना सर्दी, नाक चोंदणे, सायनोसायटिस, नाकातील हाड वा मास वाढले आहे त्यांच्याकरिता शास्त्रकारांनी अणुतेल, नस्यतेल, पाठादी तेल अशी विविध प्रकारची नाकात टाकायची तेले सांगितली आहेत. विविध प्रकारच्या जखमा, मधुमेही जखमा, महारोग्यांच्या जखमा, इसब, गजकर्ण, सोरायसिस, गँगरीन याकरिता ‘एलादी तेलाचा’ बाह्योपचार तात्काळ परिणामकारक गुण देतो. तोंड येणे, मुखपाक, चहा, जागरण, तंबाखू, खूप तिखट खाणे यामुळे गालात, तोंडात, जिभेवर फोड आलेले असता व तोंडाच्या प्राथमिक अवस्थेतील कॅन्सरसाठी इरिमेदादीतेल लावल्यास लगेच बरे वाटते. केसांत उवा, लिखा, कोंडा असल्यास करंजेल तेल व थोडासा कापूर असे मिश्रण केसांना रात्रौ लावल्यास व सकाळी शिकेकाईने केस धुतल्यास केसातील घाण पूर्णपणे नष्ट होते. आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या आरोग्य-अनारोग्य समस्यांचा विविध तेलांच्या साहाय्याने सामना कसा करावा, हे सांगणाऱ्या श्रीधन्वंतरीला सहस्र तैल प्रणाम!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कानात तेल टाकू नका

‘लास्ट बट नॉट लिस्ट इंपॉर्टन्ट’ वचन असे आहे, की ‘कानात तेल टाकणे हा गुन्हा आहे. आपल्या शरीरात कान हे आकाश तत्त्वाचे, पोकळीचे मोठे प्रतीक आहे. कानात तेल टाकण्याने कानातील खाज, पू, बहिरेपणा वाढणार, कमी होणार नाही, हे सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे.