सध्या मध्यम वर्गीयांमध्ये प्रत्येक कामासाठी मदतनीस ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. जेवण बनविणे, घरातील पाळीव श्वानाला फिरवून आणणे अशा कामांसाठी वेगवेगळे लोक ठेवले जातात. अगदी बोटही उचलता येऊ नये, यासाठी दरमहा हजारो रुपये खर्च केले जातात. मात्र या खर्चामुळे आपला वैद्यकीय खर्चही वाढत आहे यावर दिल्लीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलश सिंह यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आरामदायी जीवनशैली कशी हानिकारक आहे, हे समजावून सांगितले आहे.

डॉ. सिंग यांची एक्सवरील पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. बरेच लोक दुर्लक्ष करतात अशा कामांची यादी आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची माहिती त्यांनी दिली आहे. ते म्हणाले, डॉगवॉकर साठी ५,००० रुपये, गाडी धुणाऱ्यासाठी १,५०० रुपये, धोबी १,००० रुपये आणि कुकसाठी ८,००० रुपये खर्च केले जातात. शारीरिक काम टाळण्यासाठी तुम्ही महिन्याला १५,५०० रुपये खर्च करता.

“पण ही कामे टाळून तुम्ही बसून राहण्याची सवय लावून घेता, त्याची खरी किंमत तुम्हाला मोजावी लागते. जसे की, बायपास सर्जरीसाठी ५ लाख रुपये, आयसीयूमध्ये दररोज २५,००० रुपये आणि वैद्यकीय खर्चापोटी गमावलेले एकूण उत्पन्न आहे १० लाख रुपये”, अशी डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट डॉ. सिंह यांनी केली.

आरामदायी जीवनशैलीमुळे रोगांची भेट

डॉ. सिंह पुढे म्हणाले, वेळ नाही, गुडघे दुखतायत किंवा खूप कंटाळा आलाय, अशी कारणे देऊन आपण घरातील दैनंदिन कामे टाळत आहोत. अशाने फक्त आपल्याच नाही तर पुढच्या पिढीलाही चुकीच्या सवयी लागत आहेत. आधुनिक आरामदायी जीवनशैली हा एक सापळा आहे, ज्यामुळे आपल्याला चाळीशीतच उच्च रक्तदाब, पन्नाशीत मधुमेह आणि साठीत हृदयविकाराचा धक्का मिळत आहे.

शारीरिक हालचाल फायदेशीर कशी?

मेयो क्लिनीकने इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक हालचाल करणे हा तुमचा मुड, उत्साह आणि एकूणच आरोग्य ताजेतवाणे राखण्याचा उत्तम मार्ग आहे. नियमित व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज खर्च होऊन चयापचय सुधारते. यासाठी पायऱ्या चढणे किंवा घरातील कामे करणे यासारख्या लहान हालचालीही महत्त्वाच्या ठरतात.