अभिनेत्री करीना कपूर खान ४४ वर्षांची असून तिच्या फिटनेसचे श्रेय ती तिच्या कठोर आणि शिस्तप्रिय जीवनशैलीला देते. करीना कपूर खान सामान्यतः कॉस्मेटिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहत नाही. ती योग्य आहाराचे पालन करते, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा करते आणि वेळेवर झोपते, जेणेकरून तिची आठ तास झोप पूर्ण होईल. अलीकडच्या एका मुलाखतीत करीनाने सांगितले की, “ती संध्याकाळी ६.३० पर्यंत रात्रीचे जेवण करते, रात्री ९.३० पर्यंत झोपते आणि दिवसभराचा व्यायामाचा कोटा पूर्ण करण्यासाठी खूप लवकर ताजीतवानी (फ्रेश) होते.

“आदर्शपणे, संध्याकाळी ६.३० वाजता जेवण करणे हे सर्केडियन लय किंवा शरीराच्या प्रतिसाद यंत्रणेसाठी अनुकूल ठरते. सर्केडियन लय आणि त्याचे कार्य हे सूर्योदय ते सूर्यास्त या दैनंदिन चक्राच्या परस्परांशी जुळते. जरी आपल्यापैकी अनेकांना आपल्या कामाच्या आणि प्रवासाच्या वेळापत्रकानुसार लवकर झोपण्याची सोय नसली, तरी कामावर असतानाही आपण लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करू शकतो. शरीराचे चयापचय पुनर्संचयित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. चयापचयही प्रक्रिया ज्याद्वारे शरीर अन्नातून ऊर्जा निर्माण करते,” असे मॅक्स हेल्थकेअरच्या क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या प्रादेशिक प्रमुख रितिका समद्दार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

संध्याकाळी ६.३० वाजताचे जेवणे का चांगले आहे? (Why dinner at 6.30 pm is Good)

रात्रीचे जेवण लवकर केल्याने नैसर्गिकरित्या १२-१४ तासांचा उपवासाचा कालावधी तयार होऊ शकतो, जो intermittent fasting करण्याचा एक प्रकार आहे. या उपवासाचा बहुतेक काळ झोपेत असल्याने तुम्हाला खाण्यावर बंधन घातल्यासारखे वाटणार नाही. याव्यतिरिक्त, रात्रीचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता वगळल्याने उपवासाचा कालावधी वाढतो.

आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत?

दिवसा शरीरातील हार्मोन्स सक्रिय असतात आणि संध्याकाळपर्यंत मंदावतात, ज्यामुळे शरीर जागे होण्याच्या वेळेत सर्वोत्तम कार्य करते. पचनक्रिया चांगली होते, कारण तुम्ही जेवण आणि झोप यामध्ये तीन तासांचे अंतर ठेवता. त्यामुळे आम्लता, पोट भरणे किंवा गॅस होत नाही. पचनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी, लवकर खाल्ल्याने पोटातील घटक अन्ननलिकेत परत जाण्याची शक्यता कमी होते.

संशोधनात असे दिसून आले आहे की, “रात्रीचे जेवण लवकर घेतल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. लवकर खाल्ल्याने तुम्हाला विश्रांतीच्या वेळी जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होऊ शकते.” एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, “रात्रीचे जेवण उशिरा करणाऱ्या लोकांमध्ये फॅट्स वेगळ्या पद्धतीने साठवले जाते आणि त्यांना भूक जास्त लागते. तर्क सोपा आहे. जेव्हा झोप पचनक्रियेशी जुळते, जे तुम्ही उशिरा जेवला आणि नंतर लगेच झोपलात तर शरीराला साखर आणि फॅट्स प्रक्रिया करण्यात अधिक अडचण येते, यामुळे वजन वाढते.”

जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाशी जुळवून घेता आणि लवकर रात्रीचे जेवण करता तेव्हा झोपेचा संप्रेरक मेलाटोनिन सर्वोत्तम प्रकारे कार्य करतो. चांगली झोप दीर्घकालीन आजार कमी करते.

रात्रीचे जेवण लवकर करणे म्हणजे सकाळी उत्साही वाटते

तुमची पूर्ण झोप झाल्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हलके आणि अधिक उत्साही वाटते. तुम्ही लवकर उठता आणि दिवसाचा सर्वात उत्पादक वेळ घालवू शकता. लवकर जेवण आणि १२-१४ तास उपवास केल्याने तुमची सकाळ आरामदायी असेल, जिथे तुम्ही घाई न करता संतुलित नाश्त्याचा आनंद घेऊ शकता. घाईघाईत कॉफी, चहा आणि टोस्ट किंवा बिस्कीट घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. जर तुम्ही सकाळी लवकर उठून चालत असाल, तर उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी किंवा साधे पाणी पुरेसे आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल, तर तुमच्या दिनचर्येपूर्वी शरीरात जलद कार्ब सोडणारे केळीसारखे फळ खा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाण्याची सर्वोत्तम वेळ शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या वेळापत्रकावर अवलंबून असेल, परंतु सातत्यपूर्ण जेवण योजना निश्चितपणे शरीराचे नैसर्गिक वेळापत्रक नियंत्रित करण्यास मदत करते; जेणेकरून दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करू शकते. शक्य असल्यास संध्याकाळी ५.३० ते ७.३० दरम्यान रात्रीचे जेवण करू शकता.