Boiling Packet Milk : हल्ली अनेक जण पॅकेटचे दूध वापरतात. दूध खरेदी केल्यानंतर उकळणे हा दैनंदिन सवयीचा भाग झाला आहे. डेअरीमधील ताजे दूध असो किंवा सुपरमार्केटमधून आणलेले पॅकबंद दूध असो, सर्वांत आधी आपण हे दूध पातेल्यामध्ये ओततो आणि ते उकळण्यासाठी गॅसवर ठेवतो. सध्या पाश्चराइज्ड आणि अल्ट्रा-पाश्चराइज्ड दुधाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पॅकेटचे दूध उकळण्याची खरंच आवश्यकता आहे का? हे समजून घेणे गरजेचे आहे.

दुधाच्या पॉलिथिलीन पिशव्यांवर अनेकदा ‘पाश्चराइज्ड’, ‘टोन्ड’ किंवा ‘यूएचटी’ अशी वेगवेगळी नावे छापली असल्याचे दिसून येते. पण, ग्राहकांना त्यातील फरक कळत नाही. पॅकेटमधील पाश्चराइज्ड दुधाचे सेवन करण्यापूर्वी ते उकळणे आवश्यक आहे का आणि जर ते उकळले नाही, तर त्याचा काय परिणाम होतो, ते जाणून घेऊ….

आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी ​​दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “जर दुधाचे पॅकेट सीलबंद आहे आणि तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवले असेल, तर तुम्हाला दूध उकळण्याची गरज नाही. पाश्चराइज्ड दूध तयार करताना ते सुरुवातीला गरम केले जाते आणि पुन्हा थंड केले जाते. या प्रक्रियेत साल्मोनेला आणि ई. कोलायसारखे सूक्ष्मजीव नष्ट होतात. हे सूक्ष्मजीव रोगास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या दुधाला पुन्हा गरम करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पॅकेटमधील दूध थेट वापरू शकता. पाश्चराइज्ड दूध उकळणे हे फक्त तेव्हाच गरजेचे आहे जेव्हा तुम्हाला वाटते की, ते खराब होण्याची शक्यता आहे. पोषक घटकांचा वापर करून तुम्ही सुरक्षितपणे दुधाच्या सेवनाचा आनंद घेऊ शकता.

घरी दूध पुन्हा उकळल्याने त्याच्या पौष्टिकतेत बदल होतो का? आणि त्याचे शेल्फ लाइफ कमी होते?

घरी दूध उकळल्याने त्याच्या पौष्टिक घटकांमध्ये बदल होतो. “उकळलेल्या दुधातील बी१, बी२ (रायबोफ्लेविन), बी३, बी६ व फॉलिक अ‍ॅसिडसह व्हिटॅमिन बी हे घटक कमी होऊ शकतात. ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे व दुधात आढळणारे रिबोफ्लेविन दूध उकळल्यावर कमी होते. दुधातील काही प्रोटीन्स आणि फॅट्सवर परिणाम होतो; पण एकूणच फॅट्स आणि कॅल्शियममध्ये लक्षणीय बदल दिसून येत नाहीत”, असे मल्होत्रा सांगतात.

दूध उकळल्याने कच्च्या दुधातील जीवाणू नष्ट होऊ शकतात, असे मल्होत्रा सांगतात; पण पाश्चराइज्ड दुधात याची आवश्यकता नसते. त्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते. दूध उकळल्याने शेल्फ लाइफ वाढत नाही. खुले दूध (Opened Milk) हे उकळले किंवा उकळले नाही तरी चालेल; पण ते नेहमीच फ्रिजमध्ये ठेवले पाहिजे आणि त्याचे सेवन लवकर केले पाहिजे. अनेकांसाठी पाश्चराइज्ड दूध हे न उकळता पिणे सुरक्षित आणि पौष्टिक घटक मिळवण्यासाठी चांगले असते.

विशिष्ट प्रकारे पॅकेजिंग केलेले दूध उकळले पाहिजे की नाही?

मल्होत्रा ​​म्हणतात, “टेट्रा पॅकमधील UHT (अल्ट्रा-हाय टेम्परेचर) दूध आधीच काही सेकंदांसाठी १३५-१५०°C वर गरम केले जाते आणि निर्जंतुक पॅकेजिंगमध्ये पॅक केले जाते. ही प्रक्रिया सर्व हानिकारक जीवाणू नष्ट करते. याचा अर्थ UHT दुधाचे थेट सेवन करणे सुरक्षित आहे आणि त्यासाठी ते उकळण्याची आवश्यकता नाही. UHT दूध पुन्हा गरम करणे ही फक्त वैयक्तिक पसंतीची बाब आहे,; सुरक्षिततेची नाही.”

त्या पुढे सांगतात, “पॅकेटमधील पाश्चराइज्ड दूधसुद्धा अनेकदा जीवाणू नष्ट करण्यासाठी ७२°C वर १५ सेकंदांसाठी गरम केले जाते. जर तुम्ही हे दूध फ्रिजमध्ये ठेवले किंवा एकाच वेळी पूर्णपणे वापरले, तर उकळण्याची गरज नसते.”

कच्चे दूध पिण्यापूर्वी नेहमीच उकळले पाहिजे. जर दूध गरम केले नसेल, तर त्यात हानिकारक सूक्ष्मजीव असू शकतात. तज्ज्ञ सांगतात की, योग्य दूध निवडणे आणि ते सुरक्षितपणे त्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळू शकतात.