नवी दिल्ली : शारीरिकदृष्टय़ा सक्रिय नसलेल्या व्यक्तींना कर्करोगाचा धोका अधिक असतो. तर, रोज अवघ्या चार ते पाच मिनिटांचाही व्यायाम करणाऱ्यांना हा आजार होण्याची शक्यता कमी होते, असे एका नव्या संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन’ने कर्करोग आणि शारीरिक सक्रियता यामधील संबंध शोधण्यासाठी २२ हजार लोकांच्या दिनचर्येचा अभ्यास केला. त्यावेळी व्यायामामुळे चयापचयासंबंधी तक्रारी कमी होतात आणि कर्करोगाच्या काही प्रकारांचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो, असे स्पष्ट झाले.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार शारीरिक सक्रियतेच्या अभावामुळे दरवर्षी जगभरात ३२ लाख लोकांचा मृत्यू होतो. व्यायामामुळे सर्वसाधारणपणे शरीरात गाठ होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे रोज व्यायाम करून कर्करोगाला रोखता येऊ शकते. नव्या संशोधनासार रोज चार ते पाच मिनिटे मेहनतीची कामे म्हणजेच घाम येऊ शकेल, अशी कामे केली तरी कर्करोगाचा धोका ३२ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मेहनतीच्या कामांमध्ये वेगाने चालणे, मुलांबरोबर खेळणे, जड वस्तू उचलणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.