Guava Benefits: फळे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असे पोषण प्रदान करतात. परंतु तज्ज्ञांच्या मते, फळांच्या पानांमध्येही अनेक पोषक घटक असतात. पेरूच्या पानांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारे जास्त पोषक घटक असतात. म्हणून आम्ही रक्तातील साखर नियंत्रणासाठी काय फायदेशीर आहे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला यांनी पेरू, पेरूपासून तयार केलेली चाट आणि पेरूच्या पानांचे रक्तातील साखरेवर होणारे परिणाम याबाबतची माहिती दिली.
पेरू
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असतो, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी तो एक चांगला पर्याय आहे.परंतु, अर्ध्याहून अधिक पिकलेले पेरू जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, असे डॉ. सिंगला म्हणाले.
पेरू चाट
कमीत कमी साखर आणि मसाल्यांचा वापर करून बनवल्यास पेरू चाट हा एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. पेरूला जास्त मीठ, साखर किंवा मसाले लावून खाल्ल्याने त्याचे आरोग्यदायी फायदे कमी होऊ शकतात, असे डॉ. सिंगला म्हणाले.
पेरूची पाने
डॉ. सिंगला यांच्या मते, पेरूच्या पानांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. कारण- ते आतड्यांमध्ये शोषल्या जाणाऱ्या ग्लुकोजला रोखू शकतात आणि इन्सुलिन उत्पादनास उत्तेजन देऊ शकतात. “तुम्ही पेरूच्या पानांचे सेवन चहा किंवा अर्काच्या स्वरूपात करू शकता.”
रक्तातील साखर कमी करते
प्राणी आणि मानवी अभ्यासात पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करतात, असे आढळून आले आहे.
इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते : पेरूची पाने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
अँटिऑक्सिडंट गुणधर्म : पेरूची पाने अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
सावधगिरी बाळगा
तुमच्या आहारात कोणतेही महत्त्वाचे बदल करण्यापूर्वी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या; विशेषतः जर तुम्हाला मधुमेह किंवा इतर आरोग्य समस्या असतील.
पेरूच्या सेवनामुळे तुमच्या रक्तशर्करेच्या पातळीवर प्रतिकूल परिणाम होत नाही ना याची खात्री करण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा.
डॉ. सिंगला म्हणाले की, रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगले राहण्यासाठी, तुमच्या आहारात पेरूच्या पानांचा समावेश करण्याचा विचार करा. “पेरूची पाने रक्तातील साखर नियंत्रणासाठी अधिक प्रभावी पर्याय ठरू शकतात. कारण- त्यात ग्लुकोजचे शोषण रोखण्याची आणि इन्सुलिन उत्पादन उत्तेजित करण्याची क्षमता असते. एकंदरीत पेरू फळ आणि पेरू चाटदेखील संतुलित आहाराचा भाग ठरू शकते हे लक्षात घ्या.