scorecardresearch

Premium

Health Special: गरोदरपण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या

Health Special: गरोदरपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टी अगदी नैसर्गिक आणि तरीही काही वेळेला मानसिक ताण तणाव वाढवणाऱ्या असतात.

pregnancy & mental health
गरोदरपण आणि मानसिक आरोग्य (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“आज सकाळपासून बाळाला उचलून घेण्याची इच्छाच झाली नाही. तो रडायला लागल्यावर उलट केवढा राग आला मला! सरळ एक चापटी दिली मी त्याला गालावर. मला कळतंय, माझं चुकतंय. पण काय करू? मनात काही उत्साहच नाही आहे. पहिलटकरीण म्हणून गेले नऊ महिने केवढे कौतुक केले सगळ्यांनी! त्यात पहिला मुलगा! सगळे अगदी खूष होते. मग मलाच काय झालंय? सारखं रडू येतं, झोपून रहावेसे वाटते, कोणी भेटायला आले तर सरळ त्यांच्याकडे पाठ फिरवून मी झोपून जाते. आंघोळ करायची, जेवायची उर्मीच नाही आहे. एकेकदा वाटतं पळून जावं किंवा जीवन संपवून टाकावं.” आज मामी आली. तिने हे सगळे पाहिले आणि मला म्हणाली, ‘ मला माहित्येय, तू काही मुद्दाम करत नाही आहेस. आपण तुला बरं करूया.’ डिलिव्हरी होऊन अजून दोन महिनेसुद्धा झाले नव्हते आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले, ते ही सायकियाट्रिस्टकडे!

मला अॅडमिट केलं, माझा नवरा खंबीरपणे माझ्या मागे उभा राहिला. डिप्रेशनचे निदान झाले आणि औषधोपचार सरू झाले. काही दिवसांनी घरी आले. बाळाला घट्ट छातीशी धरले तेव्हा कुठे बरे वाटले!

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
How are warts spread and what are the symptoms
Health Special : चामखीळे कशी पसरतात आणि त्याची लक्षणं काय असतात?
pain behaviour in marathi, what is pain behaviour in marathi
Health Special : पेन बिहेवियर म्हणजे काय?
Mouni Amavasya
Mauni Amavasya 2024 : मौनी अमावस्येला या राशींना होऊ शकतो बक्कळ धनलाभ, तुमची रास यात आहे का?

गरोदरपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टी अगदी नैसर्गिक आणि तरीही काही वेळेला मानसिक ताण तणाव वाढवणाऱ्या असतात. गरोदरपणातील मनःस्थिती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. अर्थातच शरीरात होणारे बदल, अंतःद्रव्यांचे कमी जास्त प्रमाण(hormones- thyroid, cortisol), शरीरातील हिमोग्लोबिन कमी असणे(anemia), ब्लड प्रेशर वाढणे, गरोदरपणात सुरू होणारा मधुमेह अशा सगळ्या गोष्टींचा मनाच्या संतुलनावर परिणाम होतो. सतत चिंता वाटणे, डिलिव्हरी, बाळाची वाढ, या बद्दल मनात सतत विचार आणि काळजी वाटणे. झोपेवर परिणाम होणे अशी लक्षणे दिसू शकतात. कधी कधी डिप्रेशनही येते. बरीच वर्षे मूल झाले नाही आणि गरोदरपण राहिले तर मानसिक ताण जाणवतो. आधीच्या गरोदरपणात, डिलिव्हरीत आलेल्या अडचणी, अवघड बाळंतपण अशा गोष्टीनी मनात भीती निर्माण होते. या बरोबरच जर घरात पुरेसा आधार नसेल, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक कलह, वैवाहिक जीवनात संघर्ष अशी विपरीत परिस्थिती असेल तरी चिंता आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. आपल्याकडे मुलगा होईल की मुलगी हा सुद्धा चिंता निर्माण करणारा विषय असतो.

बाळंतपणात अनेक स्त्रियांना सुरुवातीचे काही दिवस आईपण स्वीकारणे जड जाते. पटकन रडू येते, आपल्याला बाळाची काळजी घ्यायला कसे जमेल अशी भीती वाटते, चिडचिड होते. घरच्यांनी आणि डॉक्टरांनी धीर दिला थोडा भावनिक आधार मिळाला की थोड्याच दिवसात आईची भूमिका जमू लागते.(postpartum blues). १५-२०% महिलांना बाळंतपणात डिप्रेशनचा त्रास होतो. उदास वाटते, बाळाची किंवा स्वतःची काळजी घेण्याची इच्छा होत नाही, बाळाला दूध पाजणे, अंघोळ घालणे, झोपवणे, खेळवणे या गोष्टी करण्यात रस वाटत नाही; किंबहुना बऱ्याच वेळा या सगळ्याला सपशेल नकार दिलं जातो. अधिक तीव्र लक्षणे असतील तर क्वचित प्रसंगी बाळाला इजा करण्याचे किंवा आत्महत्त्येचे विचार मनात येतात. डॉक्टरांकडे नेल्यावर सखोल तपासणी करावी लागते. असे डिप्रेशन पहिल्यांदाच आले का, गरोदर असताना डिप्रेशनचा त्रास झाला होता का, आधीच्या बाळंतपणामध्ये असा त्रास झाला होता का, घरात कोणाला बाळंतपणात डिप्रेशनचा विकार झाला होता का आणि गरोदरपणाच्या आधीसुद्धा कधी असा त्रास झाला होता का हे पाहावे लागते. विविध तपासण्या करून शारीरिक आजार नाही ना हे पहावे लागते. औषधोपचारांचा फार चांगला उपयोग होतो. अगदी तीव्र मानसिक आजारात, आत्महत्त्येचे विचार सारखे येत असतील किंवा बाळाला इजा करण्याची शक्यता असेल तर ई.सी. टी. हा परिणामकारक उपाय ठरतो.

आणखी वाचा: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार करायला हवा? दुःखाचे ढग कसे दूर साराल?

खूप कमी प्रमाणात बाळंतपणात सायकोसिस होतो, म्हणजे मनात संशय वाटणे, भास होणे, स्वतःचे भान नसणे, एकटक पाहत बसणे इ. लक्षणे दिसतात.
आई आणि बाळ यांच्यात जो बंध निर्माण व्हायला हवा तो ५% मातांमध्ये सहजी निर्माण होत नाही. जर आईला मानसिक विकार असेल तर, अशा ४०-५०% मातांमध्ये हा बंध निर्माण होताना अडचणी येतात. मानसिक विकारांचा उपचार करणे हे जसे या वरचे उत्तर आहे, तसेच आईच्या मनात माया निर्माण व्हावी या साठी विशेष प्रयत्न करावे लागतात. बाळाला जवळ घेण्याचे सुद्धा प्रशिक्षण द्यावे लागते. आईने बाळाचे लाड करायला तिला प्रोत्साहित करावे लागते. दोघांनी एकत्र असणे महत्त्वाचे ठरते.

क्वचित प्रसंगी बाळंतपणात मंत्रचळ होतो.(obsessive compulsive disorder) अतिस्वच्छता, जंतूंच्या प्रादुर्भावाची भीती, बाळाला इजा करण्याचा मनात विचार येणे अशी लक्षणे दिसली तर औषधोपचार करावे लागतात. गरोदरपणा आणि बाळंतपण या काळात औषधोपचार करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. गरोदर असताना गर्भाशयात नाळ आईकडून पोषण बाळाकडे पोहोचवते, तर मूल जन्माला आले की आईच्या दुधातून पोषण मिळते. याच मार्गांनी औषधेही बाळापर्यंत पोहोचतात. त्यामळे या काळात जी औषधे संशोधनाने सुरक्षित म्हणून सिद्ध झाली आहेत तीच दिली जातात. तीव्र मानसिक आजार, आधीपासून असलेले मानसिक आजार यांचा योग्य तो उपचार करावाच लागतो. उपचार न केल्याने आईची मानसिक स्थिती सुधारत नाही आणि बाळावर विपरीत परिणामही होऊ शकतो. औषधे देण्यातील जोखीम आणि फायदे याचा ताळेबंद ठरवून योग्य ते उपाय केले तर आई आणि बाळ दोघांचे मानसिक आरोग्य जपले जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pregnancy mental health issues hldc psp

First published on: 22-10-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×