Watermelon Causing Food Poisoning: साधारण ९२ % पाणी असणाऱ्या कलिंगडाला उन्हाळयात सुपरफूडचा दर्जा दिला जातो. एक कलिंगड तुम्हाला वजन, साखर, डिहायड्रेशन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. पण अलीकडे याच कलिंगडांमध्ये प्रचंड भेसळ होत असल्याचे व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कलिंगड व टरबूजामुळे विषबाधा झाल्याचे सांगणारे व्हिडीओ सुद्धा सध्या सर्वांची चिंता वाढवत आहेत. पण खरंच यात काही तथ्य आहे का?

फिजिशियन व कॉन्टेन्ट क्रिएटर डॉ. कोमल कुलकर्णी यांनी कलिंगड व टरबुजामुळे विषबाधा होते का या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले आहे. त्या म्हणतात, या फळांमुळे विषबाधा होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे पिकवताना या भाज्यांमध्ये वापरलेले कृत्रिम रंग किंवा गोडवा वाढवणारे सिरप ज्यामुळे फळांची चव आणखी गोड होते व गर अधिक रसाळ दिसू लागतो. दुसरं कारण म्हणजे फळं ज्या मातीत पिकवली जातात त्या मातीतच मुळात हानिकारक बॅक्टरीया असू शकतात.

आरोग्य प्रशिक्षक मिरुना बश्कर यांनी एका रीलमध्ये कलिंगड खाल्ल्यावर विषबाधा झाल्याचा अनुभव शेअर केला आहे. त्या म्हणतात की, “कलिंगडातील घातक कृत्रिम रंग जसे की Erythrocine यामुळे असे घातक परिणाम होऊ शकतात. माझ्याबाबत हेच झालं.”

कलिंगडामध्ये कृत्रिम रंग वापरण्याचे धोके

सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह प्रशिक्षक कन्निका मल्होत्रा ​​यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “कलिंगडाला त्याचा नैसर्गिक लाल रंग लाइकोपीन या फायदेशीर अँटिऑक्सिडंटपासून मिळतो पण तो आणखी रसाळ व खुलून दिसावा यासाठी कलिंगडामध्ये एरिथ्रोसिन सारख्या रंगांचा वापर केला जातो. असं करणं हे अत्यंत बेकायदेशीर आहे. ”

त्या असेही सांगतात की, कृत्रिम रंग घातलेले कलिंगड सामान्यतः बाजारात विकले जात नाहीत, परंतु जर तुम्ही नेहमीपेक्षा फारच गडद रंगाचे कलिंगड विकत घेत असाल तर रंगाचा स्रोत लक्षात घेणं गरजेचं आहे. कृत्रिम रंगांमध्ये शिसे किंवा मिथेनॉल सारखी हानिकारक रसायने असू शकतात, ज्यामुळे विषबाधा, पाचन समस्या आणि कर्करोगासारखे संभाव्य दीर्घकालीन धोके निर्माण होऊ शकतात.

मातीमुळे कलिंगड व टरबुजाला किती धोका असतो?

कलिंगड आणि टरबूज जमिनीच्या अगदी जवळ वाढतात. ज्यामुळे ते सामान्यतः मातीमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे दूषित होण्याची शक्यता असते. हे जीवाणू मुख्यतः कलिंगडाच्या सालीवर राहून वाढू शकतात व कलिंगड कापताना ते गरामध्ये सुद्धा मिसळू शकतात. या हानीकारकारक विषाणूंचे प्रकार व त्यामुळे होणारे नुकसान जाणून घेऊया..

साल्मोनेला: ताप, अतिसार, उलट्या आणि पेटके यासारख्या लक्षणांसह विषबाधा होणे.

ई. कोली: किडनी निकामी होण्याचा धोका, लहान मुलांसाठी अधिक धोकादायक

लिस्टेरिया: हा जीवाणू गर्भवती महिलांसाठी धोकादायक असू शकतो, कारण यामुळे गर्भपात, मृत जन्म किंवा नवजात मुलांमध्ये गंभीर संक्रमण होऊ शकते. हे जीवाणू उबदार आणि दमट वातावरणात वाढतात.

हे ही वाचा<< ६ टक्के बॉडी फॅट्स एका महिन्यात कमी करण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी पाळाच; वजन कमी करण्यासाठी झोप व आहाराचे नियम पाहा

कलिंगड खाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

स्वच्छ वाहत्या पाण्याने आणि ब्रशने कलिंगड धुवून घ्या यामुळे पृष्ठभागावरील जीवाणू कमी होऊ शकतात. अतिरिक्त संरक्षणासाठी व्हिनेगर व पाण्याचे १:३ अशा प्रमाणात द्रावण तयार करून याने कलिंगड धुवू शकता. यामुळे लगेचच जीवाणू नष्ट होतील. कलिंगड कापण्यासाठी वापरलेली सूरी व कटिंग बोर्ड सुद्धा नीट निर्जंतुकीकरण करून वापरावा .