Loosing 6 Percent Fats In Month: वजन कमी करायचंय ही जितकी कठीण वाटते त्याहून बरीच सोपी प्रक्रिया आहे फक्त आपल्याला तीन गोष्टींची आवश्यक आहे. शिस्त, व्यायामाची योग्य पद्धत व सातत्य. फिटनेस ट्रेनर ऋषभ तेलंग यांनी अलीकडेच वजन कमी करण्याच्या सोप्या उपायांविषयी माहिती दिली आहे. तेलंग यांनी सांगितल्यानुसार हे तीन सोपे उपाय एक महिन्यात शरीरातील ६ टक्के फॅट्स कमी करू शकतात. तेलंगने सांगितले की, “माझ्या आठवड्याच्या व्यायामाच्या रुटीनमध्ये दोनदा स्क्वॅट्स आणि डेडलिफ्टसह आठवड्यातून ५ दिवस वेट लिफ्टिंगचा समावेश असतो. फक्त जिमच नव्हे तर चालणे सुद्धा महत्त्वाचे आहे. मी आरामात १२- १५ हजार पाऊले आरामात चालू शकतो. व्यायामासह जेवणाकडे सुद्धा लक्ष देणे महत्त्वाचे आहे.”

शरीरातील फॅट्स म्हणजे काय? (What Are Body Fats)

डॉ मनीषा अरोरा, वरिष्ठ सल्लागार आणि युनिट प्रमुख, श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, शरीरातील चरबी ज्याला ॲडिपोज टिश्यू म्हणतात, हा एक प्रकारचा ऊतक आहे जो चरबीच्या स्वरूपात ऊर्जा साठवतो. यामुळे शरीरात इन्सुलेशन म्हणजे एकाप्रकारचे सुरक्षित अस्तर तयार होते. अवयवांसाठी हे उशीसारखे काम करते व हार्मोन्सच्या नियंत्रणात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील फॅट्स काही प्रमाणात शरीरात आवश्यक असतात. पण गरजेपेक्षा अधिक फॅट्सच्या वापरामुळे हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यासह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

वजन/ फॅट्स कमी करण्यासाठी तीन प्रभावी मार्ग

व्यायाम, आहार व चालणे यामुळे वजन कमी करण्यास मदत होते हे मान्य करून डॉ अरोरा यांनी अन्य महत्त्वाचे घटक सुद्धा अधोरेखित केले आहेत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात संतुलित आहार स्वीकारणे, नियमित व्यायाम करणे व एकूण जीवनशैली सुधारणे हे आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित प्रभाव आपल्याला वजन कमी करण्यात मदत करू शकतो.

डॉ. अरोरा म्हणाले की, एरोबिक (कार्डिओ) आणि ॲनारोबिक (वेट ट्रेनिंग) या दोन्ही व्यायाम पद्धतींचा अवलंब करायला हवा. कार्डिओ वर्कआउट्स, जसे की धावणे किंवा सायकल चालवणे, एकूण कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण वाढवते, तर वेट ट्रेनिंग हे स्नायू तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे चयापचय वाढते आणि फॅट्स कमी होण्यास मदत होते. सतत फॅट्स कमी करण्यासाठी व्यायामाच्या दिनचर्येमध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे.

कॅलरीजचे सेवन कमी करणे आणि पोषक पदार्थांच्या सेवनावर भर देणे हे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि जास्त कार्ब्स टाळून अधिक भाज्या, पातळ प्रथिने, संपूर्ण धान्य आणि आरोग्यदायी फॅट्सचा समावेश केल्याने कॅलरीजची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे फॅट्स कमी होतात.

डॉ. अरोरा यांच्या माहितीनुसार, झोपेची गुणवत्ता सुधारणे आणि तणावाची पातळी कमी करणे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते परंतु फॅट्स कमी होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. खराब झोप आणि जास्त ताण यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते जे फॅट्स साठवण्यास प्रोत्साहन देते. रोज किमान ७ ते ८ तासांच्या झोपेला प्राधान्य देणे आणि ध्यान किंवा योग यासारख्या तणाव-कमी करणाऱ्या गोष्टी केल्याने फॅट्स कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते.

एका वेळच्या जेवणात भात व पोळ्यांचे आदर्श प्रमाण किती हवे? ताटात कुठल्या गोष्टी किती टक्के हव्यात? तज्ज्ञांनी दिलं सूत्र

‘या’ ३ गोष्टी फॉलो करून कुणीही शरीरातील ४ ते ६ टक्के फॅट्स कमी करू शकतो का?

फिटनेस तज्ज्ञ तरुणदीप सिंग रेखी यांनी सांगितले की, “कॅलरीजचे प्रमाण कमी करणे व वजन उचलून व्यायाम करणे यापलीकडेही अनेक गोष्टी वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. प्रथिनांच्या सेवनाचे प्रमाण वाढवणे, स्नायू बळकट करणे व त्यांच्या दुरुस्तीसाठी योगदान देणे, HIIT हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला हवे. त्याशिवाय प्रत्येक शरीर वेगळे आहे, प्रत्येक शरीरासाठी आवश्यक व्यायाम, आहार वेगवेगळा असू शकतो. आपल्या आरोग्यस्थितीशी परिचित असलेल्या वैद्यांचा सल्ला आवर्जून घ्या.