Dehydration Symptoms in summer : उन्हाळा म्हटलं की, बऱ्याच जणांना डिहायड्रेशनच्या समस्येला बहुतेकदा सामोरं जावं लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं शरीरावर गंभीर परिणाम उदभवू शकतात. या काळात शरीराला पुरेसं पाणी मिळणं खूप गरजेचं असतं. आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार व मिनरल्स शरीराबाहेर फेकले जातात; ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी-जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणी पिणं आवश्यक असतं. या लेखात, आपलं शरीर किती लवकर डिहायड्रेट होऊ शकते, उन्हाळ्यात कुणी जास्त काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला थंड, हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेणार आहोत.

डॉ. नसिरुद्दीन जी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. जसजसं तापमान वाढत जातं, तसतसं तुमचं शरीर थंड होण्यासाठी ओव्हरड्राइव्हमध्ये जातं. हे वाढत्या घामामुळे होतं, जेव्हा द्रवपदार्थाचं सेवन कमी होतं तेव्हा घाम कमी होतो, डिहायड्रेशन होतं.

शरीरातील पाणी ३० मिनिटांत होऊ शकते कमी

डॉ. नसिरुद्दीन यांच्या मते, उन्हाळ्यात मेहनतीचं काम किंवा व्यायाम केल्यानं तुमच्या शरीरातील पाणी ३० मिनिटांत कमी होऊ शकतं. अशा वेळी घरातही सुरक्षिततेची हमी मिळत नाही. उष्ण, दमट वातावरण विशिष्ट औषधांसह एकत्रित केल्यानं तुम्हाला असलेला डिहायड्रेशनचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

सर्वांत जास्त धोका कोणाला?

मुलं, वृद्ध आणि उन्हात काम करणारे किंवा उष्ण, दमट वातावरणात राहणारे लोक विशेषतः डिहायड्रेशनला बळी पडतात. सुरक्षित राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे तहान लागण्यापूर्वीच हायड्रेशनला प्राधान्य देणं, असं डॉ. नसिरुद्दीन सांगतात.

उष्णतेवर मात करा अन् हायड्रेटेड राहा

या उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी आणि थंड राहण्यासाठी डॉ. नसिरुद्दीन यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

नियमितपणे पाणी प्या : दररोज सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा. किंवा पाण्यात मीठ आणि साखर मिसळून साधे पाणी प्या. तहान लागेपर्यंत थांबू नका.

लघवी तपासणी : तुमच्या लघवीच्या रंगाचं निरीक्षण करा. स्वच्छ किंवा हलका पिवळा रंग चांगलं हायड्रेशन दर्शवितो; तर गडद पिवळा रंग डिहायड्रेशन दर्शवितो.

हेही वाचा >> उन्हाळ्यात घरी आल्या आल्या लगेच अंघोळ करता? थांबा! डॉक्टरांनी सांगितलेला धोका अन् अंघोळीची योग्य वेळ जाणून घ्या

तुमच्या शरीराचे ऐका

गडद लघवी, मळमळ किंवा चक्कर येणं यांसारखी चिन्हं डिहायड्रेशन दर्शवितात. थंड, हवेशीर जागा शोधा. सतत पाणी प्या आणि लक्षणं कायम राहिल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.

डिहायड्रेशन गंभीर असू शकते

हायड्रेशनला प्राधान्य द्या. जास्त उष्णतेचा संपर्क टाळा आणि तुम्हाला लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडीशी तयारी आणि जागरूकता दाखविल्यास तुम्ही उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये सहजतेने राहू शकता.

योग्य कपडे परिधान करा

ऋतुमानानुसार योग्य कपडे वापरले, तर आरोग्याची व्यवस्थित काळजी घेता येते. अनेक जण उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात सर्वाधिक सुती कपड्यांचा वापर करावा. सुती कपड्यांमध्ये पाण्याचे शोषण जास्त असते. त्यामुळे आपला घाम त्यात शोषला जातो आणि वातावरणात सहजपणे बाष्पीभवन होते. म्हणूनच उन्हाळ्यात सुती कपडे घालावेत.

काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत

लाल, काळा हे रंग टाळावेत. कारण- हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून गडद रंगाऐवजी गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा हे रंग वापरण्यायोग्य आहेत. तसेच उन्हात ते शोभूनही दिसतात.