दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्या हा चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरच बेशुद्ध झाला. चित्रपटातील नियोजित चित्रकरणादरम्यान एका दृश्यामध्ये सिक्स पॅक्स दाखवण्याच्या उद्देशाने नाग शौर्या दिवसभर पाणी न पिता चित्रकरण करत असल्याने त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने नाग शौर्याची शुद्ध हरपल्याचं कारण सांगण्यात आलं आहे. “नागा शौर्य सेटवर बेशुद्ध पडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डिहायड्रेशनमुळे तो बेशुद्ध झाला होता पण आता तो ठीक आहे,” अशी माहिती ‘हैदराबाद टाईम्स’ने दिली आहे. नागा शौर्याबरोबर घडलेल्या या प्रकारामुळे डिहायड्रेशनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण कशामुळे होतं? शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसून येतात यासंदर्भात जाणून घेऊयात…
> सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. किंवा उष्णता वाढल्यास अथवा शरीराचं तापमान वाढल्यास निर्जलीकरण (डिहायड्रेशन) होऊ लागते.
> डिहाड्रेशनची लक्षणेही ओळखता यायला हवीत. कारण ही लक्षणं दिसली तर व्यक्ती बेशुद्ध पडण्याआधीच त्याचा वेळीच मदत करता येईल. मात्र ही लक्षणे दिसण्याची वेळच आणू नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
> तहान लागणे, तोंड कोरडे पडणे ही प्राथमिक लक्षणं दिसू लागताच पुरेसे पाणी प्यावे. वात येणे, डोकेदुखी, चक्कर आदी त्रासांची वाट न पाहता भरपूर पाणी प्यावे.
> शरीरातून घाम, मूत्र, मल, तसेच उच्छ्वासावाटेही पाणी कमी होत असते. यासह काही प्रमाणात क्षारही बाहेर पडतात.
> ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी उन्हाळ्यात किंवा अती धावपळ झाल्यास आणि शरीराचं तापमान वाढल्यास पाण्याचं उत्सर्जन होण्याचा वेग वाढतो. जर पाण्याचे शरीरातील योग्य प्रमाण राखले नाही, तर निर्जलीकरणाचा त्रास सुरू होतो.
> मूत्राचा रंग जर पिवळसर, गडद पिवळा दिसू लागला तर निर्जलीकरणाचे ते प्रमुख लक्षण मानलं जातं.
> शरीरात पाण्याचे योग्य संतुलन राखल्यास लघवीचा रंग फिकट किंवा रंगहीन दिसतो.
> तहान लागण्याची वाट पाहू नका, तुमचे तोंड कोरडे पडते, त्यावेळी तुमच्या शरीरात निर्जलीकरण प्रक्रिया सुरू झाल्याचे समजावे.
> लघवीचा रंगही आपण किती प्रमाणात पाणी प्यावे हे सांगणारा निदर्शक आहे.
> आपली पाण्याची गरज आपल्या वजनावर अवलंबून असते. खेळ, व्यायाम अथवा उन्हात वावर असल्यास अधिक पाण्याची गरज भासते. पाणी पिण्याची सवय लागण्यासाठी पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा.
> खरबूज, काकडी, टोमॅटो, किलगड खाल्ल्यानेही शरीराला पाणी व उपयुक्त घटक, खनिजे मिळतात. शहाळ्याचे पाणी शरीरात ऊर्जा निर्माण करते.
> लिंबू सरबत, सोलकढी, लस्सी, ताक आणि शुद्ध निरा या पेयांनी शरीरातील पाण्याची गरज तर भागतेच, शिवाय शरीराला ऊर्जा देणारे क्षारही त्यातून मिळतात.