आरोग्यवार्ता : स्मृतिभ्रंश दूर ठेवण्यासाठी चांगली निद्रा महत्त्वाची

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ६५ वर्षांआधी स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) विकाराने ग्रस्त होणाऱ्या रुग्णांचे जगभरातील प्रमाण नऊ टक्के आहे.

sleep-apnea
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ६५ वर्षांआधी स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) विकाराने ग्रस्त होणाऱ्या रुग्णांचे जगभरातील प्रमाण नऊ टक्के आहे. यामागचे प्रमुख कारण निद्रा विकार आहेत. आइसलँडची नॅशनल बायोइथिक्स समिती व ऑस्ट्रेलियातील ह्युमन रिसर्च इथिक्स कमिटीने केलेल्या अभ्यासानुसार खंडित निद्रेचा (स्लीप अ‍ॅप्निया) विकार असलेल्यांत ‘अल्झायमर’ होण्याची शक्यता बळावते. ‘स्लीप अ‍ॅप्निया’ विकार असलेल्या रुग्णांतील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने ‘टाऊ’ व ‘बीटा अमायल़ॉईड’ ही स्मृतिभ्रंशास कारणीभूत विषद्रव्ये मेंदूत आढळतात.

मेंदूविकार तज्ज्ञांच्या मते, निद्रा ही मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची असते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा पुर्नसचयित होते. थकवा जातो. सर्वसाधारणपणे रात्रीच्या गाढ झोपेमुळे मेंदूची सर्व कार्ये सुरळीत होतात. मेंदू ताजातवाना होतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी सहा ते आठ तास झोप गरजेची असते. झोपेची ही गरज व्यक्तिनिहाय वेगवेगळी असू शकते. आपल्या शरीरातील जैविक घडय़ाळानुसार (बॉडी क्लॉक) वर्तन करणे गरजेचे असते. निद्रेच्या चांगल्या सवयींचे पालन आवश्यक असते. रात्रीची झोप लाभदायक असते. झोपेत बाधा आणणारे मोबाइल पाहण्यासारखे प्रकार झोपेआधी टाळावेत. मद्यपान, धूम्रपान करून झोपू नये. प्रत्येक सजीवाचे जैविक घडय़ाळ असते. त्यानुसार उठणे-झोपण्याची क्रिया होत असते. विशिष्ट संप्रेरकांमुळे ही जैविक लय सांभाळली जाते. मात्र, त्याविरुद्ध म्हणजे झोपेच्या वेळी जागरण करणे वगैरेमुळे ही लय बिघडते. स्मृतिभ्रंशामागे निद्राविकार हे महत्त्वाचे कारण आहे. काही कंपवाताच्या (पार्किन्सन्स डिसिज) रुग्णांमध्ये ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ (आरईएम), ‘स्लीप बीहेव्हर डिसऑर्डर’ आदी निद्राविकार आढळतात. त्यामुळेही स्मृतिभ्रंश विकार होण्याची शक्यता वाढते. चांगल्या झोपेअभावी निराशा, चिंता, अस्वस्थता राहते. त्यामुळे रक्तदाब, पक्षाघात आदींचाही धोका असतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी शांत निद्रा ही अत्यावश्यक असते, असे तज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Healthnews good sleep important dementia patients sleep disorder ysh

Next Story
Tamarind For Skin Care: सुंदर त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ पद्धतींनी करा चिंचेचा वापर; मिळतील आश्चर्यकारक फायदे
फोटो गॅलरी