Uric acid control Fruits: आजच्या धावपळीच्या जीवनात अनियमित आहार, पुरेसे पाणी न पिणे, गोड आणि तेलकट पदार्थांचे जास्त सेवन यांमुळे अनेक लोकांना युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची (हायपर्युरिसेमिया) समस्येचा त्रास होतो. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे हा एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे सांधेदुखी, सूज येणे आदी लक्षणे दिसतात आणि जर तो दीर्घकाळ राहिला, तर त्याचा मूत्रपिंडांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे; पण त्यात आहाराचादेखील मोठा वाटा आहे. नैसर्गिक मार्गाने युरिक आम्ल कमी करण्यासाठी काही फळे अतिशय उपयुक्त आहेत. ही फळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, सूज कमी करण्यास आणि मूत्रपिंडांचे कार्य वाढविण्यास मदत करतात.

१. संत्री व लिंबू

संत्री आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी मूत्रपिंडांचे कार्य सुधारते आणि युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन करण्यास प्रोत्साहन देते. विशेषतः सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने शरीरातील आम्लता कमी होण्यास मदत होते. हलका नाश्ता म्हणून संत्र्यांचा वापर करणेदेखील फायदेशीर आहे. वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लिंबाचा रस किंवा त्याच्या पाण्यात विरघळणाऱ्या अर्काचे सेवन केल्याने युरिक अॅसिडची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते.

२. बेरीज (स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी)

बेरी केवळ चविष्टच नसतात, तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी व पॉलीफेनॉलदेखील भरपूर असतात. हे घटक शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यास आणि जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात. बेरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे मूत्रपिंडांतील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. ही फळे तुमच्या सकाळच्या दही, स्मूदी किंवा फळांच्या सॅलडमध्ये सहजपणे वापरली जाऊ शकतात. संशोधनानुसार, पॉलीफेनॉलचे जास्त सेवन युरिक अॅसिडची पातळी कमी ठेवण्यास मदत करते.

३. चेरी

आकाराने लहान असूनही, चेरी हे युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी फळ आहे. त्यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे जळजळ कमी करण्यास आणि युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, चेरीचे नियमित सेवन केल्याने युरिक अॅसिडची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते.

४. केळी

केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मूत्रपिंडांना योग्य रीतीने कार्य करण्यास आणि युरिक अॅसिडचे उत्सर्जन करण्यास मदत करते. तसेच, केळ्यामध्ये प्युरिनचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे युरिक अॅसिड जमा होण्याचा धोका कमी होतो. गाऊट किंवा जास्त युरिक अ‍ॅसिड असलेल्या लोकांसाठी केळे हे एक आदर्श फळ आहे. विविध आहारविषयक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, केळी युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात.

५. अननस

अननसात ब्रोमेलेन नावाचे एंझाइम असते, ज्यामध्ये नैसर्गिक दाहकविरोधी गुणधर्म असतात. ते सांध्यांतील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते. तसेच अननस पाण्याने समृद्ध असल्याने, मूत्रपिंडांचे कार्य वाढवते आणि युरिक अॅसिडचे उत्सर्जन सुधारते. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ५-७ दिवस अननसाचा रस सेवन केल्याने गाऊटशी संबंधित वेदना लक्षणीयरीत्या कमी होतात.

उच्च युरिक आम्ल कमी करण्यासाठी या फळांचा नियमित आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्याशिवाय, पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि जीवनशैलीत सुधारणा करणे या सर्वांचा एकत्रित परिणाम युरिक आम्ल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.