मुलांचा डब्यात काय द्यायचे हा आईसमोरचा यक्ष प्रश्न असतो. मुलांना काहीतरी रुचकर हवे असते आणि आईला पौष्टीक द्यायचे असते. मग या दोन्हीचा मध्य गाठता आला तर? चांगलेच ना, मुलांना पोषणमूल्येही मिळतील आणि त्यांना वेगळे काही खाल्ल्याचा आनंदही. मात्र यासाठी आईने काही गोष्टी लक्षात घेणे आणि थोडा वेगळा विचार करणे गरजेचे असते. हल्ली आईकडेही मुलांचे हट्ट पुरविण्यास वेळ कमी असतो. मात्र या कमी वेळातही मुलांच्या जीभेचे लाड आणि आरोग्यदायी डबा देता येईल. बिस्कीट किंवा केक देणं सोपं आहे. मात्र त्याचे दिर्घकालिन परिणाम आरोग्यास निश्चितच हानिकारक ठरु शकतात. मग कमीत कमी वेळात असा पौष्टिक खाऊ करायला आपण शिकलो तर! पाहूया असेच काही झटपट बनवता येतील असे पदार्थ

पौष्टिक खाऊमध्ये या घटकांचा आवर्जून समावेश करा
१. डाळीं असलेले पदार्थ
२. फळे
३. भाज्या
४.सोयबिन असलेले पदार्थ
५. दलिया
६. रवा
७. कणिक
८. सगळ्यी धान्यांची पीठे
९. ओट्स
१०. कडधान्ये

डब्या साठी खाऊ..ज्यातून प्रथिने, कर्बोदके,अ जीवनसत्व, फायबर, कॉलशिअम, लोह हे सगळे मिळेल
१) डाळींचा डोसा
कसा कराल-दलिया + मूंग डाळ/सालीचा मूंग+ सालीचा उडिद/ उडिद डाळ- हे रात्री भिजत घाला- सकाळी वाटून लगेच डोसा घाला. बरोबर कोथींबिर,पुदीना, दाणे, चटणी देता येईल.

२) फ्रॅंकी रोल
वरील डोसा करावा व त्यात चटणी पासरावी व त्यावर कोबी गाजर अशी भाजी करुन पासरावी. त्याचा रोल करुन छोटे छोटे कापून द्यावेत.

३) पराठा रोल
कणिक +सोयाबीन पीठ+ डाळीचे पीठ+ हळद+ जीरे पूड+तिखट मिठ + किसलेला कोबी + किसलेले गाजर घालून पीठ मळून घ्यावे. पराठा लाटुन घ्यावा. त्यावर तूप व चटणी लवावी. रोल करुन छोटे छोटे काप करुन द्यावेत.

४) स्टफ पराठा रोल
कणिक+ सोयाबीन पीठ घालून पीठ मळावे. मसुर किंवा चवळी किंवा हिरवा मूग उसळ करावी. ही उसळ कणकेमध्ये भरुन पराठा लाटावा, भाजावा. आता तूप लावून रोल करुन छोटे छोटे काप करुन सॉसबरोबर दिल्यास मुले आवडीने खातात.

५) सोया डोसा
दलिया+ सोयाबीन+मूग डाळ+ उडिड दाल- रात्रभर भिजवणे, सकाळी वाटून लगेच डोसा घालणे. यातच भाजी घालून रोल पण करता येईल.

६) दलिया उपमा
दलिया + मूग एकत्र कुकरला शिजवून घेणे. कढईमध्ये तेल घ्या. जीरे+ हींग+ लसुण +सोयाबीन + चिरलेला कोबी+ फरसबी+ कोथिंबीर हे सगळे परतावे. नंतर शिजलेला दलिया घालून परतावे. वाफ आणावी.

आठवड्यात काही दिवस पोळी भाजी आणि यातील काही पदार्थ देऊ शकता. कारण पोळी भाजी जितकी पौष्टिक तितके हे पदार्थ देखील पौष्टिक आहेत. उलट नुसत्या पोळी भाजीतून प्रथिने मिळत नाहीत ती सुद्धा या पदार्थातून मिळतात. विशेषतः लहान मुलांना हा खाऊ नक्की आवडेल व आपल्या हाताने सहज खाता येईल.

संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर भूक नसते परंतु जेवणाचीही वेळ नसते तेव्हा काय देता येईल ते पाहू
१) फुलवलेल्या ज्वारी/ बाजरी/गहु चा चिवड़ा ज्यात फुटाणे व भाजलेले शेंगदाणे आहेत + दाण्याची चिक्की+ कोणतेही फळ
२) शेवयांचा भाज्या घालून उपमा + राजगीरा चिक्की + फळ
३) उकलडलेला बटाटा+ किसून गाजर+भिजवलेले सोयाबिन + आलं लसुण मिरची ठेचून या मिश्रणाची रवा लावून टिक्की बनवा + फळ
४) उकडलेला मका+ भाज्या+ भिजवलेले दाणे+ उकडून बटाटा+मीठ+लिंबू+ चुरमुरे अशी भेळ
५) वेगवेगळ्या पिठाची उकड + कोणतेही फळ