हृदयविकारामुळे जगभरातील एकतृतीयांश लोकांचे मृत्यू होत असून त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

पूर्व युरोप, मध्य आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडाचा काही भाग येथील जनगणनेनंतर हा निकष काढल्याची माहिती संशोधकांनी दिली. जागतिक आरोग्यासाठी हृदयरोग हा मोठा धोका आहे, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील जॉर्जी रॉथ यांनी सांगितले. केवळ उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांमध्येच हा आजार आढळत नसून मध्यमवर्गीय कुटुंबातही या विकाराने मोठय़ा प्रमाणात शिरकाव केला आहे, असेही रॉथ म्हणाले. २०१५मध्ये ४०० कोटी लोकांना हृदयरोग असल्याचे स्पष्ट झाले. तर जगभरातील १८ कोटी लोकांचा हृदयरोगामुळे बळी जात असल्याचेही स्पष्ट झाले होते. १९९० ते २०१० या काळात वाढत्या वयानुसार मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, हृदयरोगामुळे हे प्रमाण कमी होऊन अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे संशोधक सांगतात. १९९०मध्ये एक लाख लोकांपैकी ३९३ जणांचा हृदयविकाराने मृत्यू होत होता. हे प्रमाण २०१०मध्ये एक लाख लोकांमागे ३०७ मृत्यू असे घटले. त्यानंतर पुढील पाच वर्षांत हे प्रमाण एक लाख लोकांमागे २८६ असे घटले होते.

उपचाराची साधने कमी असलेल्या देशांमध्ये उच्च हृदयरोगाचा धोका अधिक असतो, असे साओ पावलो विद्यापीठातील पावलो लोटुफो यांनी सांगितले.