Heart Attack Symptoms: आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनारोग्यदायी जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी हृदयाचे आजार हे फक्त वृद्ध लोकांमध्ये दिसतात, असे मानले जात होते; पण आता ते तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. सध्याच्या काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, धमन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे. चुकीची जीवनशैली, वाढता लठ्ठपणा आणि आनुवंशिक कारणे ही त्यामागची मोठी कारणे मानली जातात. पण, धमन्यांमध्ये ब्लॉकेज होण्यापूर्वीच शरीरात काही लक्षणे दिसू लागतात; मात्र लोक ती दुर्लक्ष करतात आणि पुढे तीच गंभीर आजाराचे कारण बनतात.
धमनी (आर्टरी) ब्लॉकेजची समस्या का होतेय? (Artery Blockage)
धमनी म्हणजे हृदयातून रक्त शरीराच्या इतर भागांपर्यंत नेण्याचे काम करणारी रक्तवाहिनी. जेव्हा त्यामध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साठून थर (प्लाक) तयार होतो, तेव्हा रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो आणि हृदयावरील ताण वाढतो. पूर्वी ही समस्या हळूहळू अनेक वर्षांनी तयार होत असे; पण आजकाल जंक फूड, प्रोसेस्ड फूड, धूम्रपान, वेपिंग, ताणतणाव आणि खूप वेळ बसून राहण्याच्या सवयीमुळे ही प्रक्रिया लवकर होते. त्याशिवाय लठ्ठपणा, टाइप-२ डायबिटीज आणि आनुवंशिक कारणांमुळेही तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदयाच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे (Heart Attack Early Symptoms)
टीनेजर्सना वाटतं की, हृदयाचे आजार त्यांच्यापासून खूप दूर आहेत. म्हणून ते सुरुवातीची लक्षणे गंभीरपणे घेत नाहीत आणि अनेक साधी लक्षणेसुद्धा दुर्लक्ष करतात. पण, हीच लक्षणे हळूहळू पुढे जाऊन मोठ्या समस्येचे कारण ठरतात.
- कारण नसताना छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे
- थोडेसे काम केल्यावरही थकवा येणे किंवा धाप लागणे
- हृदयाची धडधड खूप वेगाने होणे किंवा अनियमित होणे
- वारंवार चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
- पोटात किंवा छातीत दडपण जाणवणे
- आर्टरी ब्लॉकेजची समस्या कशी समजते
आज मेडिकल सायन्समध्ये अनेक आधुनिक तपासण्या उपलब्ध आहेत, ज्यामुळे धमनी ब्लॉकेज लवकर समजू शकते. धमनी ब्लॉकेज तपासण्यासाठी डॉक्टर ईसीजी, इकोकार्डिओग्राफी, ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट, सीटी कोरोनरी एंजियोग्राफी किंवा लिपिड प्रोफाइलिंग अशा चाचण्या करतात.
हृदय कसे निरोगी ठेवावे? (Heart Attack Signs)
राजीव गांधी रुग्णालयातील वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित कुमार यांनी सांगितले की, तरुणांमध्ये धमनी ब्लॉकेज टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये (होल ग्रेन्स), चांगली चरबी व प्रोटीनयुक्त आहार घ्या आणि जंक फूड, प्रोसेस्ड फूड व साखर कमी खा. त्यासोबत दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा कुठलीही शारीरिक हालचाल करा. धूम्रपान आणि दारू यापासून दूर राहा.