हृदयाला जर काही इजा झाली असेल तर हृदयाच्याच उतींचे कलम करून ती भरून काढता येते असे प्राण्यांवरील प्रयोगात दिसून आले आहे. माणसातही हृदयाच्या स्नायूंचे कलम करून रुग्णांना बरे करता येईल असे संशोधकांचे मत आहे. सध्या डुकरांवर ही प्रक्रिया करण्यात आली असून त्यांचे मानवावरील प्रयोगही केले जातील असे जर्मनीतील हँबर्ग-एपेनडॉर्फ मेडिकल सेंटर विद्यापीठाचे प्राध्यापक थॉमस एशेनहागेन यांनी सांगितले. हृदयाला झालेली इजा ही नेहमी स्नायूंची हानी झाल्याने होत असते, ती भरून काढता येत नाही, पण आता मूलपेशींच्या मदतीने ते शक्य होणार आहे. दोन प्रकारच्या पेशी यात वापरता येऊ शकतात- एक म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशी व एंडोथेलियल पेशी. त्या रक्तवाहिन्यांच्या आवरणात असतात. वैज्ञानिकांनी हृदयाच्या स्नायूच्या पट्टय़ा तयार केल्या असून त्यांचा वापर हृदयाची हानी दूर करण्यासाठी करता येतो असे लाइव्ह सायन्सने म्हटले आहे. डुकरांमध्ये हे प्रयोग यशस्वी झाले असून या प्रक्रियेत २८ दिवसांत कलम केलेल्या पेशी जखमी अवस्थेतील हृदयात एकात्म होऊन ते बरे करतात व हृदयाचा नवीन स्नायू तयार होतो. त्यामुळे हृदयाची रक्त सोडण्याची शक्ती ३१ टक्के वाढते. जर्नल सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)