नवी दिल्ली : निद्रानाशामुळे हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. या संदर्भात  ‘स्लीप अ‍ॅडव्हान्सेस’ या संशोधन पत्रिकेत एका अभ्यासाची निरीक्षणे देण्यात आली आहेत. सरासरी ६२ वर्षांपर्यंतच्या एक हजार व्यक्तींचा अभ्यास या संदर्भात करण्यात आला. ज्यांना गेल्या १६ महिन्यांत हृदयविकाराचा झटका आला आहे अथवा हृदय वाहिन्यांतील अडथळे काढण्याची शस्त्रक्रिया झाली आहे, अशांचा यात समावेश केला गेला. त्यांच्याकडून भरून घेतलेल्या प्रश्नावलीतून त्यांच्या झोपेच्या सवयी जाणून घेण्यात आल्या. पूर्वी झालेल्या त्रासांविषयीही जाणून घेण्यात आले. त्यांचे चार वर्षे निरीक्षण करण्यात आले. या काळात यापैकी कुणाला पक्षाघात, हृदयविकाराचा झटका अथवा हृदयविकाराने मृत्यू झाल्यास तशा नोंदी ठेवण्यात आल्या.

या अभ्यासानुसार या व्यक्तींपैकी जवळपास निम्म्या व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास होता. त्यातील २४ टक्के व्यक्ती झोपेची औषधे घेत होती. पाठपुराव्याच्या काळात २२५ व्यक्तींना ३६४ वेळा हृदयविकाराचा मोठा त्रास सहन करावा लागला. जर यापैकी कुणालाही निद्रानाशाचा विकार नसता तर १६ टक्के व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास झाला नसता, असा या अभ्यासाचा निष्कर्ष निघाला. घोरण्याच्या सवयीने, तसेच झोपेत श्वासनलिकेत अडथळे येऊन अत्यल्प काळासाठी श्वास थांबल्याने झोप खंडित होते. याला ‘स्लीप अ‍ॅप्निया’ म्हणतात. त्यामुळेही निद्रानाशाचा विकार जडून हृदयविकाराचा धोका संभवतो. त्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करता येतो. आपल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते, असे स्पष्ट करून तज्ज्ञ सांगतात, की त्यामुळे आपल्या शरीर आणि मनाला पुरेसा आराम मिळतो. गाढ झोपेत आपला रक्तदाब जागे असतानाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी होतो. पुरेशा झोपेअभावी रक्तदाब घटत नाही. असे सातत्याने घडल्याने हृदयावर ताण येतो. निद्रानाश टाळण्यासाठी निद्रेसंबंधीच्या योग्य सवयी लावणे गरजेचे आहे. झोपेआधी काही काळ मोबाइल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक, संगणकीय वापर थांबवावा. लवकर निजणे आणि लवकर उठणे गरजेचे आहे. दिवसा झोप घेणे टाळावे. मद्य, कॉफी-चहा झोपेआधी टाळावा. नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. या उपायांनीही जर निद्रानाश जात नसेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.