आपल्या अनुपस्थितीत घराची सुरक्षा हा नेहमीच आपल्या चिंतेचा विषय असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत हा चिंतेचा विषय केवळ घरातील मौल्यवान वस्तूंपुरता मर्यादित न राहता घरातील वयोवृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले यांच्याभोवतीसुद्धा फिरू लागला आहे.

घरांचे आकार आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरातील सदस्यांची संख्या वयोवृद्ध आईवडील, लहान मुले आणि पतीपत्नी इतकीच मर्यादित राहू लागली आहे. त्यातच पतीपत्नी दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर असले आणि घरात वृद्ध आईवडील आणि मुले एकटीच असतील तर त्यांच्याबद्दल दिवसभर घोर लागून राहतो. अशा परिस्थितीत आपल्याला आहे त्या ठिकाणावरून घरातील व्यक्तींवर लक्ष ठेवता यावे, यासाठी बाजारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत आणखी अद्ययावत सुविधा देणाऱ्या यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत. यातच भर पडली आहे ती, गोदरेज स्पॉटलाइट या कॅमेऱ्याची.

आपण कामानिमित्त घराबाहेर असताना घरात असलेल्या लहान मुलांच्या किंवा वयोवृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्याची सोय देणारे हे गृहसुरक्षा कॅमेरा उपकरण एक चांगला आणि किफायतशीर पर्याय आहे. वायफायद्वारे इंटरनेटशी जोडल्या जाणाऱ्या या कॅमेऱ्यांमार्फत टिपले जाणारे दृश्य तुम्हाला थेट तुमच्या संगणक किंवा स्मार्टफोनवर दाखवण्याची सुविधा हे उपकरण देते. इंटरनेटचा कमीत कमी वापर करून वेगवान सेवा पुरवणारे असे हे उपकरण आहे.

गोदरेज स्पॉटलाइट काय आहे?

साधारणत: वीतभर आकाराचा हा कॅमेरा घरात कोणत्याही कोपऱ्यात छताजवळ किंवा भिंतीवर सहज अडकवता येतो. चार्जिंग करून किंवा यूएसबीच्या मदतीने विद्युत प्रवाहाशी जोडून तुम्ही तो सुरू करू शकता. तो सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर किंवा संगणकावर कंपनीचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे तुम्ही कॅमेऱ्याला घरातील वायफाय यंत्रणेशी संलग्न करू शकता. एवढी प्रक्रिया पार पाडताच तुम्ही कॅमेऱ्याद्वारे ‘लाइव्ह फीड’ मिळवू शकता.

कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये

हा कॅमेरा नव्वद अंशाच्या कोनात वरखाली होऊ शकतो तसेच जवळपास ३६० अंशाच्या परिघात फिरून त्या परिघातील जवळपास तीस फुटांपर्यंतची दृश्ये स्पष्ट स्वरूपात टिपू शकतो. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे कुठूनही हा कॅमेरा हव्या त्या अंशात फिरवून त्याद्वारे थेट दृश्य पाहू शकता.

कॅमेऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तो एका वेळी साधारणपणे ११० अंश कोनातील दृश्य टिपू शकतो. शिवाय घरातील प्रकाशानुसार तो ब्राइटनेस आपोआप कमी-अधिक करू शकतो. अगदी रात्रीच्या अंधारातील दृश्येही तो व्यवस्थितपणे दाखवतो.

या कॅमेऱ्यामध्ये मोशन सेन्सर अलर्टची सुविधा असून एखादी संशयास्पद हालचाल दिसली की कॅमेरा आपल्याला स्मार्टफोनवर लगेच पूर्वसूचना देतो. शिवाय यामध्ये स्मार्ट मोशनचीही सुविधा असून घरातील व्यक्तींच्या हालचालींनुसारही तो वेगवेगळ्या कोनांत फिरू शकतो.

या कॅमेऱ्यांतून केवळ बघण्याची सुविधा नसून तुम्ही घरातील व्यक्तींशी थेट संवाद साधू शकता. त्यासाठी यात उच्च दर्जाचा माइक पुरवण्यात आला असून छोटा स्पीकरही देण्यात आला आहे. तुम्ही एकाच वेळी तीन उपकरणांना कॅमेऱ्याशी जोडून त्याद्वारे घरातील हालचालींवर लक्ष ठेवू शकता.