अप्पर लिप्सवरील केसांपासून सुटका हवी आहे? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

अप्पर लिप्सवरील केसांपासून सुटका करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

आजकालच्या अनेक तरुणी किंवा महिला सुंदर दिसण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळे वॅक्सिंग करणे, आयब्रो, मेनिक्युअर, पेडिक्युअर किंवा अपर लिप्स असे अनेक प्रयोग त्या करत असतात. थोडक्यात, या सगळ्यामुळे चेहऱ्यावर किंवा हातापायावर असलेले अनावश्यक केस दूर करण्याचा हा प्रयत्न असतो. मात्र अनेक जणी अप्पर लिप्समुळे (ओठांच्या वरच्या बाजूस असलेली लव किंवा बारीक केस) त्रस्त असतात. त्यामुळे दर महिन्याला ब्युटीपार्लरमध्ये जाऊन वेदनादायक ट्रिटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी ओठांवरील लव कमी करता येऊ शकते.

१. हळद –
ओठांवरील लव कमी करण्यासाठी हळद ही अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी एक चमचा हळद आणि अर्धा चमचा पाणी घेऊन त्याचा लेप तयार करावा. हा लेप ओठांच्या वरच्या बाजूस लावावा त्यानंतर अर्ध्या तासाने हा लेप बोटांच्या सहाय्याने थोडासा लव असलेल्या ठिकाणी चोळावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा प्रयोग महिन्यातून ४-५ वेळा करावा. त्यामुळे ओठांवर होणारी केसांची वाढ कमी होते.

२. लिंबू आणि साखर –
दोन चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात अर्धा चमचा साखर टाकावी. त्यानंतर साखर विरघळल्यानंतर ही पेस्ट लव असलेल्या भागावर लावावी. १५ मिनीटांनंतर ही पेस्ट थंड पाण्याच्या सहाय्याने धुवून घ्यावी. त्यामुळे ओठांवर असलेली अतिरिक्त लव आपोआप कमी होते. हा प्रयोग महिन्यातून २-३ वेळा करावा.

३. अंडी –
अंड्यामधील पांढरा भाग ओठांवरील लव कमी करण्यास फायदेशीर ठरतो. यासाठी एक चमचा अंडातील पांढरा भाग घेऊन त्यात चणा डाळीचं पीठ आणि थोडीशी साखर मिक्स करावी. ही तया पेस्ट साधारणपणे अर्धा तास लव असलेल्या भागावर लावून ठेवावी. त्यानंतर ती वाळल्यावर चेहरा धुवावा. यामुळे केसांची वाढ कमी होते.

४. दही आणि बेसन-
दही आणि बेसन यांच्या वापरामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त केस कमी होण्यास मदत मिळते. त्यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा बेसन घ्यावं. त्यात किंचितशी हळद टाकावी आणि ही पेस्ट ओठांच्या वरच्या बाजूस लव असलेल्या ठिकाणी लावावी. त्यानंतर ही पेस्ट वाळल्यावर हाताने ती चोळावी.

५. ओट्स –
एक चमचा ओट्स घेऊन त्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिक्स करावा. त्यानंतर ही पेस्ट लव असलेल्या ठिकाणी लावावी. पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Home remedies to clean upper lip forever try turmeric honey lemon and sugar to remove hair on upper lip ssj