भारतीय वैज्ञानिकांचे यश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधामध्ये तोंडाच्या कर्करोगाने होणाऱ्या जखमा बऱ्या करण्याची क्षमता असते हे लक्षात घेऊन या जखमा बरी करणारी रेशीम व मध वापरलेली एक पट्टी विकसित करण्यात आली आहे, असे भारतीय वैज्ञानिकांनी म्हटले आहे. आयआयटी खरगपूरच्या रासायनिक अभियंता, डॉक्टर्स व जैवतंत्रज्ञांनी आंतरविद्याशाखीय संशोधनात मधाचे औषधी उपयोग स्पष्ट केले आहेत. या वैज्ञानिकांनी रेशीम व मध यांच्या वापरातून एक औषधी पट्टी तयार केली आहे. आयआयटी व स्कूल ऑफ मेडिकल सायन्स यांनी केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, या पट्टीने तोंडातील कर्करोगाच्या जखमा भरतात व पुन्हा कर्करोग होत नाही. मध हे जखमा भरण्याच्या व कर्करोगविरोधी गुणधर्मासाठी ओळखले जाते व त्यात जिवाणूरोधक गुणही असतात. बायोमेट्रिक पद्धतीने मध व रेशीम यांचे स्कॅफोल्ड तयार करता येतात, असे संशोधक मोनिका राजपूत यांनी सांगितले. नॅनो तंत्रज्ञानातील संकल्पना वापरून आयआयटी खरगपूरचे प्रा. रविव्रत मुखर्जी यांनी ही संकल्पना मांडली. मधाचा वापर करण्याची कल्पना ज्योतिर्मय चटर्जी यांची आहे. तोंडाच्या कर्करोगात शस्त्रक्रिया केली जाते व खराब भाग काढून टाकला जातो तरी त्यात कर्करोगाच्या काही पेशी राहतात. त्यामुळे कर्करोग पुन्हा होऊ शकतो. पण आमच्या नवीन तंत्रज्ञानाने कर्करोग पुन्हा होत नाही. असे सहसंशोधक नंदिनी बंदारू यांनी सांगितले. सध्या अशी औषधी पट्टी उपलब्ध नाही की ज्यामुळे जखमा भरून येतात. या संशोधनासाठी पेटंटचा अर्ज करण्यात आला असून अमेरिकन केमिकल सोसायटीच्या एसीएस बायोमटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीयिरग नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. प्रयोगशाळेत या पट्टीमुळे निरोगी पेशींची वाढ झाली. व कर्करोग पेशींची वाढ रोखली गेली, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे तंत्रज्ञान किफायतशीरही आहे. दर तासाला तोंडाच्या कर्करोगाने एकाचा मृत्यू होतो. किमान ४० टक्के कर्करुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे असतात. यावर प्राथमिक अवस्थेत उपचार होत असले तरी कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey and silk helpful for mouth cancer
First published on: 06-12-2016 at 02:45 IST