6 Tips for Choosing the Right School for Your Child : मूल शाळेत जाण्याइतकं मोठं झालं की, त्याचे चांगल्या शाळेत अॅडमिशन करावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण, शाळेत अॅडमिशन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचे असते. फक्त बाहेरून शाळेची इमारत चांगली आहे की वाईट यावरून त्या शाळेतील शिक्षण चांगले आहे की वाईट ठरवता येत नाही, त्यासाठी शाळेविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी लागते.
जर शाळेतील शिक्षण, वातावरण योग्य नसेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वाढीवर आणि एकूण विकासावर होत असतो, त्यामुळे मुलांचे शाळेत अॅडमिशन करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे जाणून घेऊ..
मुलासाठी योग्य शाळा कशी निवडावी? (Right school for your child in india)
१) शाळेचं ठिकाणं
मुलासाठी निवडलेली शाळा ही घरापासून थोडी जवळ असणं गरजेचे आहे, कारण घरापासून शाळा फार दूर असेल तर रोज ट्रेन, मेट्रो किंवा बसने प्रवास करून ते शाळेत पोहोचण्यापूर्वीच थकून जातील, म्हणूनच शाळेचे लोकेशन घरापासून खूप दूर नसावे. तसेच शाळा जवळ असल्यास मुसळधार पाऊस किंवा काही अडचणींच्या वेळीही मुलाला सहज जाऊन घेऊन येऊ शकतो.
२) सुरक्षितता
मुलाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मुलाला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासले जात आहे की नाही, शाळेत योग्य सीसीटीव्ही सिस्टीम आहे की नाही याची माहिती घ्यावी. तसेच मुलाला शाळेत दुखापत झाल्यास योग्य मेडिकल हेल्प मिळते की नाही याचीदेखील चौकशी करावी. मुलासाठी अशी शाळा निवडा, जिथे त्याच्या सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते.
३) शैक्षणिक मंडळ
तुम्ही मुलाचे ज्या शाळेत अॅडमिशन करणार आहात, ती शाळा नेमकी कोणत्या बोर्डाशी संलग्न आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. ती शाळा सीबीएसई बोर्ड आहे की आयसीएसई ते देखील पाहा. तुमच्या आवडीनुसार बोर्ड पाहून तुम्ही कोणत्या शाळेत अॅडमिशन घ्यायचे हे ठरवू शकता. तुम्हाला ज्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या शाळेचा शैक्षणिक इतिहास, गेल्या काही वर्षांत त्या शाळेची शैक्षणिक कामगिरी कशी होती आणि त्या शाळेचे माजी विद्यार्थी कोण आहेत हे नक्की तपासा.
४) एक्स्ट्रा करिकुल अॅक्टिव्हिटीज
शाळेत कोणत्या प्रकारच्या एक्स्ट्रा करिकुल अॅक्टिव्हिटीज आहेत, तसेच शाळेत त्या गोष्टींवर किती लक्ष केंद्रित केले जाते हे पालकांनी पाहिले पाहिजे. मुलांच्या सर्वांगीण विकासात एक्स्ट्रा करिकुल अॅक्टिव्हिटीज आणि खेळ इत्यादी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शिक्षणाबरोबर एक्स्ट्रा करिकुल अॅक्टिव्हिटीज होत असलेल्या शाळांमध्येच मुलांचे अॅडमिशन करा.
५) शाळेचे वातावरण, शिक्षणाचा दर्जा
शाळेचे एकूण वातावरण कसे आहे घेणे महत्त्वाचे आहे. शाळेचे संस्थापक कोण आहे आणि शाळेची एकूण वर्तणूक आणि दर्जा काय आहे ते समजून घ्या. कारण शाळेच्या एकूण वातावरण, शिक्षकांचे वागणं, आणि शिकवण्याची पद्धत सर्व गोष्टींचा मुलाच्या विकासावर परिणाम होत असतो, म्हणूनच कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शाळेचे वातावरण, शिक्षणाचा दर्जा कसा आहे हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.
६) शाळेची फी, डिपॉझिट
वरील सर्व गोष्टींबरोबर शाळेची फी आणि डिपॉझिटविषयी नीट माहिती करून घ्या, कारण तुम्ही निवडलेल्या बोर्डनुसार त्या शाळेची फीदेखील वेगळी असणार आहे, त्यामुळे तुमचा महिन्याचा एकूण खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च याचा ताळमेळ बसवूनच त्यानुसार योग्य शाळेची निवड करा.