Claning Tips: बाथरूम हे घरातील सर्वाधिक वापरले जाणारे ठिकाण असते. इथे स्वच्छता राखणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच नळ आणि सिंक यांची काळजी घेणंही आवश्यक ठरतं. दररोज सतत पाणी पडत राहिल्यामुळे नळ आणि सिंकवर जंग बसणे, डाग पडणे किंवा पांढरे डाग जमणे ही अगदीच सामान्य समस्या आहे. विशेषतः हार्ड वॉटरमुळे सिंकच्या पृष्ठभागावर आणि नळावर पांढरे डाग घट्ट बसतात. काही वेळा तर गंजामुळे तपकिरी रंगाचे डागही दिसू लागतात. हे डाग दिसायला अत्यंत वाईट दिसतात आणि त्यामुळे बाथरूमची शोभा कमी करतात.
अनेकदा लोक हे डाग काढण्यासाठी बाजारात मिळणारे केमिकल्स वापरतात. मात्र, ही केमिकल्स महागडी असतात आणि ती वापरल्याने हाताला इजा होण्याची किंवा धातूवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी घरगुती सोपे उपाय अवलंबले तर नळ आणि सिंक पुन्हा नव्यासारखे झळकू शकतात. चला तर मग जाणून घेऊया असे तीन सोपे उपाय .

१. व्हिनेगरचा वापर करा


बाथरूमच्या नळांवर किंवा सिंकवर लागलेले हट्टी डाग काढण्यासाठी व्हिनेगरपेक्षा उत्तम पर्याय नाही. व्हिनेगरमधील नैसर्गिक घटक गंज आणि डाग सहज विरघळवतात. यासाठी कापडाचा तुकडा घेऊन तो व्हिनेगमध्ये भिजवा. आता हे कापड नळ किंवा सिंकवर नीट गुंडाळा. साधारण २०-३० मिनिटे तसेच ठेवून द्या. ठराविक वेळेनंतर कापड काढा आणि डिशवॉश लिक्विड व ब्रशच्या साहाय्याने घासून घ्या. नळ आणि सिंकवरील हट्टी डाग सहज निघून जातील.

२. लिंबाने करा स्वच्छ


लिंबामध्ये असलेले साइट्रिक ॲसिड नैसर्गिकरीत्या डाग विरघळवते. विशेषतः हार्ड वॉटरमुळे बसलेले पांढरे डाग काढण्यासाठी लिंबू अत्यंत प्रभावी ठरतो. यासाठी एक लिंबू अर्धे कापून नळावर किंवा सिंकवर थेट घासा. पाच-दहा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. या प्रक्रियेमुळे केवळ डागच जात नाहीत तर धातूची नैसर्गिक चमकही परत येते.

३. बेकिंग सोड्याने आणा पुन्हा चमक


बेकिंग सोडा म्हणजे घरगुती क्लीनिंगचा उत्तम उपाय. स्वयंपाकघरातील डबे असो की बाथरूममधील सिंक, बेकिंग सोड्याने घाण सहज निघते. यासाठी एक स्पंज घ्या आणि त्याला हलका ओलसर करा. आता त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. सिंकवरील किंवा नळावरील डागांवर हा स्पंज नीट घासा. काही मिनिटांनी पाण्याने धुऊन टाका. जिद्दी डाग सहज निघून जातील आणि नळ पुन्हा चमकू लागेल.