How to polish silver jewellery: सणासुदीचे दिवस सुरू आहेत. गणपती होऊन गेले आता नवरात्री, दसरा, दिवाळी तोंडावर आले आहेत. अशात तुमच्याही घरात लगबग सुरू झालीच असेल. साफसफाई, व्रतवैकल्यांची तयारी, दागदागिने काढून ते पॉलिश करून ठेवणे अशी खूप काही तयारी असते. घरची तयारी आवरली की महिलांचं विशेष लक्ष असतं ते स्वत: तयार होण्याकडे. मग साडी, सोन्या-चांदीचे दागिने हे स्वच्छ करून घेणे आले.
महिला दररोजसुद्धा पैंजण आणि अंगठ्या वगैरे घालतातच. रोजच्या वापरात असलेल्या चांदीच्या दागिन्यांची चमक हळूहळू कमी होऊ लागते. अशावेळी कोणत्याही सणासुदीच्या किंवा समारंभाच्या वेळी ते घालणे टाळावे लागते. चांदीचे दागिने दररोज वापरल्याने काळे पडतात. ते घरच्या घरी चमकवण्यासाठी तुम्हाला या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील.
बेकिंग सोडा आणि पाणी
चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट एखाद्या ब्रशच्या मदतीने चांदीच्या दागिन्यांवर लावा आणि दागिने काही वेळ तसेच ठेवून द्या. थोड्या वेळाने ते हलक्या हाताने घासून घ्या. काही मिनिटांतच डाग आणि काळेपणा सहज निघून जाईल.
साबण आणि कोमट पाण्याचा वापर
चांदीचे दागिने हाही उपाय तुम्ही करू शकता. यासाठी पाणी गरम करा आणि त्यात दागिने घाला. काही वेळाने ते बाहेर काढा आणि त्यावर हाताने साबण लावा आणि चांगले घासून घ्या. त्यानंतर ते पुन्हा कोमट पाण्याने धुवा. मग मऊ कापडाने चांगले पुसून घ्या. त्यामुळे दागिन्यांमधील घाण साफ होईल.
अॅल्युमिनियम फॉइलचा वापर
चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचाही वापर करता येईल. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात अॅल्युमिनियम फॉइलचा तुकडा घाला. आता त्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि थोडे मीठ घाला. त्यानंतर दागिने त्यात १० मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.