How to Clean Sticky Exhaust Fan at Home: किचन म्हणजे घराचं हृदय… आणि त्या किचनमध्ये कायम चालू असणारा धूर, तेलाचे तुषार, तळणाची वाफ आणि मसाल्यांचा गंध या सगळ्यांना बाहेर फेकण्याचं काम करतो तो छोटासा एक्झॉस्ट फॅन. पण, हा जीव की प्राण असलेला फॅनच काही दिवसांनी आपल्या डोळ्यात खुपायला लागतो, कारण त्याची जाळी धुळकट, तेलकट आणि काळपट पडते. पंख्याच्या पात्यांवर इतका चिकट थर चढतो की जरा जवळ गेलं की श्वास घ्यायलाही त्रास व्हावा. अशा वेळी फॅन बदलून नवा घेण्याचा विचार करण्याआधी हे एका महिलेने व्हिडीओ शेअर करुन सांगितलेले सोपे हॅक ट्राय करून बघा. तुमचा जुना एक्झॉस्ट फॅन पुन्हा एकदम ब्रँड न्यू दिसू लागेल.

जाळी कशी स्वच्छ कराल?

एक्झॉस्ट फॅनची जाळी ही घाण आणि तेलाचा मुख्य अड्डा. यासाठी गरम पाणी हाच सर्वोत्तम उपाय. गरम पाण्यात थोडं डिटर्जंट मिसळून त्या जाळीला भिजवून ठेवा. घाण फारच हट्टी असेल तर अर्धा कप ब्लिच घाला आणि जाळी तासभर पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे सगळा चिकटपणा आपोआप सुटायला लागेल.

पंख्याच्या पाती चमकदार कशा कराल?

महिलेने सांगितल्यानुसार, पाती स्वच्छ करणं ही खरी कसरत. पण, थोडं स्मार्ट झालात तर काम सोपं आहे. साबण-पाण्याचं मिश्रण करून मायक्रोफायबर कापडाने पुसून घ्या. जर डाग हट्टी असतील तर खास फॉर्म्युला वापरा, १/४ अमोनिया, २ चमचे बेकिंग सोडा आणि १ कप कोमट पाणी. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून पंख्याच्या पात्यांवर फवारणी करा आणि मग तारेच्या काथ्याने हलकेच घासून काढा. हातात ग्लोव्हज घालायला मात्र विसरू नका.

नेहमी घरच्या घरी मिळणाऱ्या छोट्या वस्तूंनीही चमत्कार करता येतो. जर तुम्ही पंधरवड्यातून एकदा हे क्लिनिंग केलं, तर एक्झॉस्ट फॅन कधीच जास्त खराब होणार नाही आणि जर फॅन फारच बिकट अवस्थेत असेल तर सोडियम फॉस्फेटसारखं केमिकल वापरून पाहा. याशिवाय छोटासा स्टीमर असेल तर त्याने चिकट डाग मऊ करून मग साध्या कापडाने पुसा – एकदम झकास परिणाम दिसेल.

फॅन कितीही घाण झालेला असला तरी हार मानू नका. हे हॅक वापरले तर फक्त काही मिनिटांत तुमचा किचनचा एक्झॉस्ट फॅन चमचमीत दिसू लागेल आणि सर्वात महत्त्वाचं – नवा फॅन घेण्यासाठी खर्च करण्याची गरजच नाही.

येथे पाहा व्हिडीओ

Dimple’s Family and Kitchen या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)