Heavy Blanket Cleaning Tips : थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात जाड ब्लँकेट्सचा वापर केला जातो. पण, ब्लँकेट्स खूप खराब झाल्यास धुवायचे कसे अशी चिंता सतावते. कारण पाण्यात भिजत टाकल्यानंतर ब्लँकेट्स खूप जड होते, त्यामुळे ते नीट स्वच्छ करता येत नाही. अशाने अनेकदा त्यातील डिटर्जंटचे पाणीही नीट बाहेर येत नाही, त्यामुळे ब्लँकेट्सवर पांढरे डाग पडतात आणि त्यातील मऊपणा हरवून जातो.
घरात वॉशिंग मशीन असेल तर अनेकजण त्यात ब्लँकेट्स धुण्याचा विचार करतात. पण, काहींना मनात दहा प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये ब्लँकेट्स धुवायचे की नाही? याने मशीन तर खराब होणार नाही ना? धुवायचे झाल्यास ते कशाप्रकारे धुवावे? म्हणून आज मशीनमध्ये ब्लँकेट धुण्यासंबंधित काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ…
मशीनमध्ये किती जड ब्लँकेट धुवू शकता?
वॉशिंग मशीनमध्ये ब्लँकेट टाकण्यापूर्वी त्याचे वजन जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा मशीन योग्यरित्या कार्य करू शकत नाही, तसेच मशीन खराब होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत वॉशिंग मशीनमध्ये फक्त नऊ किलो वजनाचे ब्लँकेट्स धुणे सुरक्षित मानले जाते.
ब्लँकेट कोणत्या सेटिंगवर धुवावे?
ब्लँकेटच्या फॅब्रिकचे नुकसान होऊ नये आणि वॉशिंग मशीनवर जास्त भार पडू नये म्हणून ते नेहमी थंड पाण्याने आणि थोड्या डिटर्जंटने जेंटल वॉशिंग सेटिंगवर धुवावे.
ब्लँकेट धुताना करू नका ‘ही’ चूक
ब्लँकेट धुताना ब्लीच वापर करणे टाळा, कारण यामुळे ब्लँकेटच्या फायबरचे नुकसान होऊ शकते. तसेच फॅब्रिक सॉफ्टनर वापरू नका, कारण यामुळे तुमच्या ब्लँकेटचा मऊपणा कमी होऊ शकतो.
‘या’ टेक्निकच्या मदतीने मशीनमध्ये धुवू शकता जड ब्लँकेट
चांगल्या कंपन्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जड ब्लँकेट सहजपणे धुता येतात. परंतु, तरीही आपण आपल्या बाजूने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि म्हणून जर ब्लँकेट जड असेल तर ते अर्धे धुवा.
त्यासाठी आधी ब्लँकेटचा अर्धा भाग स्वच्छ करण्यासाठी मशीनमध्ये ठेवा आणि नंतर तो धुऊन झाल्यावर दुसरा ठेवा. त्यामुळे एकावेळी मशीनवर फारसा भार पडणार नाही आणि ब्लँकेट चांगल्या प्रकारे स्वच्छदेखील होईल.