बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘काय मग? आता पुढे काय?’ ‘कुठे प्रवेश घेणार?’ अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आजकाल तर मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्याची अधिक चिंता असते, पण माहिती असतेच असे नाही. काळाबरोबर वाढत जाणाऱ्या संधी आणि पर्यायाने वाढणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती असणे तसे अवघडच आहे. बारावीनंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला असे तीन पर्याय आहेत. त्यापैकी कलाशाखेबद्दलची माहिती जाणून घेऊयात. समाजाला केवळ डॉक्टर, अभियंत्यांचीच नव्हे तर समाजशास्त्रज्ञांसह इतर मानव्यशास्त्राशी संबंधित व्यावसायिकांचीही मोठी गरज असते. याला अनुसरून अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक कला शाखेची निवड करत आहेत, त्यांचे स्वागत करायला हवे.

कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे प्रमुख कारण म्हणजे कला शाखेतील विषयांद्वारे नवनव्या क्षेत्रांमध्ये खुल्या होणाऱ्या संधी हे आहे. अभियांत्रिकी, वैद्यक यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक ठरणाऱ्या टक्केवारीची वाढलेली चुरस, अभियांत्रिकी आणि वैद्यक अभ्यासक्रमाचा वाढलेला आवाका आणि यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये वाढणारा ताणतणाव टाळून नवनव्या करिअरच्या वाटांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी कला शाखेकडे वळू लागले आहेत.

आणखी वाचा : सलाम! १५ व्या वर्षी लग्न, संसार सांभाळून ३६ व्या वर्षी झाली बारावी 

इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य यासारख्या कला शाखेतील मानव्यशास्त्रांना प्राप्त झालेले महत्त्व आणि त्याद्वारे खुली होणारी करिअरची निरनिराळी क्षेत्रे यामुळे कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आज संख्या वाढत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच समांतर असा इतर अभ्यासक्रम शिकणे, एखादीकला शिकणे हे कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सहजशक्य असते. व्यक्तिमत्त्व विकासासंबंधीचा एखादा अभ्यासक्रम शिकणे अथवा एखादी नवी भाषा शिकणे अशा उपक्रमांसाठी आवश्यक ठरणारा फावला वेळ कला शाखेच्या विद्यार्थ्यांना हाताशी मिळतो. त्यामुळे प्रत्यक्षात नुसते बी.ए. करून हव्या त्या करिअरमध्ये प्रवेश करणे हे जरी सुकर नसले तरी क्रमिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे बरेच काही शिकता येते, म्हणून कला शाखेच्या वाटय़ाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

आणखी वाचा : Maharashtra HSC Result : परीक्षेत नापास झालात तरी अपयशाने खचू नका..

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्यास बीएस्सी करण्यापेक्षा कला शाखेत प्रवेश घेऊन इतर पूरक अभ्यासक्रम शिकणे, अथवा बीएमएम, बीएफए यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम करणे याकडे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. शास्त्र विषयांतील केवळ पदवी कुठल्याही करिअरमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेशी नसते. त्यापेक्षा एखाद्या क्षेत्रातील प्रवेश सुकर होईल, असा पदवी अभ्यासक्रम विद्यार्थी निवडताना दिसतात.

आज मानव्यशास्त्रांमधील करिअरच्या नव्या संधी निर्माण होताना दिसतात. मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे यांत पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशक, सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये विविध पदांवर, सामाजिक संशोधन उपक्रम अशा विविध करिअरमध्ये प्रवेश करणे शक्य बनले आहे. हे लक्षात घेत संबंधित विषयात पदवी संपादन करण्यासाठी विद्यार्थी कला शाखेकडे वळत आहेत.

(आणखी वाचा : शाब्बास! आयपॅडवर परीक्षा देत दिव्यांग निष्काने मिळवले ७३ टक्के)

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी म्हणून कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज लक्षणीय आहे. कला शाखेतील इतिहास, राज्यशास्त्र यासारखे विषय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पूरक ठरतात. त्याचबरोबर पदवी शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षांच्या प्रत्यक्ष तयारीसाठी बराच वेळ देता येतो, म्हणूनही कला शाखेकडे वळणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

गेल्या काही वर्षांत लवकरात लवकर करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. कामाच्या अनुभवातून मुलाचे व्यक्तिमत्त्व विकसित होते, यावर आजच्या पालकवर्गाचाही विश्वास आहे आणि म्हणून शिकता शिकता नोकरी करावी याला आजच्या पालकवर्गाची ना नसते. हा कामाचा अनुभव प्रत्यक्ष पदवीपेक्षाही अधिक उपयोगी पडत असल्यानेही अशा विद्यार्थ्यांना कला शाखा सोयीचे पडत असल्याचे निरीक्षण प्राध्यापकवर्ग नोंदवतो.

अलीकडे अनेक हुशार विद्यार्थी ज्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळणे शक्य असते, तेही त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना पुनर्विचार करतात. अभ्यासक्रमाची सहा वर्षे आणि त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता संबंधित करिअरमध्ये रुळायला त्यांना किमान आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. मात्र आर्थिक स्थितीमुळे वा इतर काही कारणांमुळे इतकी वर्षे अध्ययनात व्यतीत करणे अनेकांना जिकिरीचे वाटते आणि मग त्या तुलनेत इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास हे गुणवंत प्राधान्यक्रम देतात, असे निरीक्षण काही प्राध्यापकांनी नोंदवले आहे.

(हा लेख लोकसत्ता २०१४ च्या करिअर वृत्तान्तमध्ये प्रकाशित झाला आहे )