अनेक लोकांना सभेत किंवा व्यासपीठावर बोलण्याची भीती वाटते. लोक आपल्याला पाहात असतील तर आपल्या चुका उघडय़ा पडतील, असे वाटत असल्याने अनेकांच्या कामगिरीवर परिणाम होतो. एरव्ही एकटे असताना जी गोष्ट आपण सहजपणे करतो तीच गोष्ट चारचौघांसमोर करताना अनेकांना भीती वाटते. पण नव्या वैज्ञानिक संशोधनानुसार कोणीतरी पाहात असेल तर व्यक्तीची कामगिरी सुधारण्यास मदत होते असे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधक विक्रम चिब यांनी या विषयावर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सोशल कॉग्निटिव्ह अ‍ॅण्ड अफेक्टिव्ह न्यूरोसायन्स या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

वास्तविक प्रथम चिब थोडय़ा वेगळ्या विषयाचा अभ्यास करत होते. प्रेक्षकांच्या गर्दीसमोर खेळाडू एकदम थिजून कसे जातात यावर ते संशोधन करत होते. त्यातून त्यांना लक्षात आले की, मेंदूमधील व्हेंट्रल स्ट्राएटम नावाचा भाग हा प्रकार नियंत्रित करतो.

या संशोधनानंतर संशोधकांनी प्रेक्षकांसोमर व्यक्तीच्या कामगिरीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी काही स्वयंसेवकांना पैसे देऊन व्हिडीओ गेम्स खेळायला सांगितले. त्या वेळी त्यांच्या मेंदूचे एमआरआय यंत्रांनी निरीक्षण केले. एका वेळी खेळताना त्यांना कोणी पाहात नव्हते. तर दुसऱ्या वेळी काही प्रेक्षक त्यांचा खेळ पाहात होते. प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्वयंसेवकांची कामगिरी ५ ते २० टक्क्यांनी सुधारली असल्याचे जाणवले. प्रेक्षकांच्या उपस्थितीत व्यक्तीच्या मेंदूतील ‘रिवार्ड सिस्टीम’ अधिक कार्यान्वित होते आणि त्याची कामगिरी सुधारते असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to develop confidence
First published on: 22-04-2018 at 00:57 IST