Cockroaches, Ants Kitchen Hacks Home Remedies : स्वयंपाकघर एक अशी जागा आहे जिथे स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा धोका वाढतो. स्वयंपाकघरात अस्वच्छता वाढली की झुरळं, मुंग्या आणि लहान मोठ्या कीटकांची संख्याही वाढत जाते. ट्रॉलीतील भांड्यांवर तर कधी स्वयंपाकघरातील ओट्यावर ही झुरळं फिरताना दिसतात. अनेकदा अन्नपदार्थांमध्येही झुरळांचा शिरकाव दिसून येतो, जे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. काही दिवसांनी किचनच्या कानाकोपऱ्यात ही झुरळं फिरताना दिसतात, ज्यांना घालवण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले जातात, पण ते तात्पुरते मरतात आणि पुन्हा काही दिवसांनी फिरताना दिसतात. त्यामुळे आम्ही किचनमधील कानाकोपऱ्यात लपलेल्या झुरळ, कीटक आणि मुंग्यांना घालवण्यासाठी दोन सोप्पे आणि प्रभावी उपाय घेऊन आलो आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही झुरळ, कीटक अन् मुंग्यांपासून सुटका करून घेऊ शकता.
सोशल मीडियावर मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी किचनमधून झुरळ, कीटक अन् मुंग्यांना पळवण्यासाठी दोन सोपे उपाय सांगितले आहेत.
१) साखर, बोरिक पावडर
किचनमधून झुरळ, मुंग्यांना पळवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बोरिक पावडर वापरणे. यासाठी एका लहान भांड्यात बोरिक पावडर आणि साखर पावडर समान प्रमाणात घ्या. हे मिश्रण एकत्र करून किचनमध्ये ज्या कोपऱ्यांमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आहे त्या कोपऱ्यात शिंपडा, साखरेने झुरळ आणि मुंग्या आकर्षित होतील आणि बोरिक अॅसिडने ते मरून जातील.
२) बेकिंग सोडा आणि साखर
एका भांड्यात बेकिंग सोडा आणि साखर पावडर घ्या, आता त्यात दोन चमचे व्हाइट व्हिनेगर मिक्स करा, आता मिश्रणाचे छोटे गोळे करून ते झुरळांचा अधिक वावर असलेल्या ठिकाणी चिकटवून ठेवा. अशाने किचनमधील झुरळ, मुंग्या आणि किटक तर नाहीसे होतीलच, शिवाय किचनमधील कुबट वासही कमी होईल.
झुरळांना पळवण्यासाठी करून पाहा ‘हा’ हॅक
इंडिया पेस्ट कंट्रोल कंपनीचे दीपक शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, जेल आणि पावडरच्या स्वरूपात येणारे बोरिक अॅसिड हे कीटक नियंत्रणासाठी वापरले जाते. बोरिक अॅसिडमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असल्याने झुरळ, मुंग्या किंवा कीटक त्याच्या संपर्कात आल्यास ते मरतात.
पण तुम्ही झुरळ, मुंग्या मारण्यासाठी बोरिक पावडरचे योग्य प्रमाण घेणं आवश्यक आहे. तसेच घरात नेमकं कोणत्या ठिकाणी झुरळ, मुंग्यांचा वावर असतो त्या जागा शोधून तिथे त्याची फरवाणी केली पाहिजे, अशाने काही दिवसांत तुमच्या घरातील सर्व झुरळ, मुंग्या नाहीश्या होतील.
पण लक्षात ठेवा, बोरिक अॅसिडचा झुरळांच्या अंड्यांवर काहीच परिणाम होत नाही, त्यामुळे ते पूर्णत: झुरळांचा नायनाट करू शकते असे म्हणता येणार नाही; त्यामुळे घरात झुरळ, मुंग्यांना येण्यापासून रोखण्यासाठी आधी किचन स्वच्छ ठेवा.
यावर सेलिब्रिटी शेफ अनन्या बॅनर्जी यांनी सांगितले की, झुरळांमुळे अन्न दूषित होते. अशाने पोटाच्या समस्या, पचनक्रियेत त्रास आणि संसर्गदेखील होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता, आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे